“महाराष्ट्र लुटणाऱ्या मोदी, शहांचे हेलिकॉप्टर तपासा,” उद्धव ठाकरेंचा संताप…

0
62

अकोला : आम्हाला जे कायदे लागू आहेत, ते सत्ताधारी पक्षातील नेत्यांना देखील लागू राहिले पाहिजे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांची येताना नव्हे, तर जातांना तपासणी करा. महाराष्ट्र लुटून ते नेत आहेत, असा हल्लाबोल शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वाशीम येथे केला.

वाशीम येथे शिवसेना उमेदवार डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीकास्त्र सोडले. आचारसंहिता केवळ आपण पाळायची, सत्ताधाऱ्यांनी ती धाब्यावर बसवायची. आयुष्यात प्रथमच बॅगची तपासणी झाली. आम्ही लोकशाही पाळतो, म्हणून आम्हाला कायदा दाखवता. सत्ताधाऱ्यांचे काय? त्यांच्यासाठी कायदे नाहीत का? त्यांच्या हेलिकॉप्टर म्हणून काय कायदे उतरतात का? असे संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले.महाराष्ट्रातील अंधार दूर करण्यासाठी हातात मशाल घेतली. कोणी कितीही पैसे वाटले तरी आपण आयुष्य विकणार नाही, याची खात्री आहे. सोयाबीन, कापसाला भाव नाही, मात्र गद्दारांना भाव मिळाला. भ्रष्टाचाराचे आरोप केले. राखी बांधली तर लाडकी बहीण झाली. यांचे समाधान होतच नाही. परिषदेवर घेतले तरी विधानसभेत उभ्या आहेत. पडणार हे माहीत आहेच, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भावना गवळींचा समाचार घेतला.

मुख्यमंत्री असताना कर्जमाफी दिली होती. शेतमालाला भाव दिला होता. जे बोललो ते करून दाखवले. नरेंद्र मोदी २०१४ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे बोलले. मात्र, आज काय स्थिती आहे. त्यांनी केवळ थट्टा चालवली आहे. मुंबई अंबानी, अदानींच्या घश्यात टाकत आहे. मुंबईवर गुजराती लोकांपेक्षा महाराष्ट्रातील भूमिपूत्रांचा जास्त अधिकार आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गुजराजला देत असाल, तर ते होऊ देणार नाही. पुन्हा मविआचे सरकार आणा, यांना सुतासारखे सरळ करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे ते मृत्यूला जवळ करतात. शेतकऱ्यांच्या पुत्राला शिक्षण घेण्यासाठी देखील पैसा नाही. शेतकऱ्यांची मुले शिक्षण अर्धवट सोडत आहेत. मुले-मुली यांच्यात भेदभाव करण्याचे पाप सरकार करीत आहे. शेतकऱ्यांचा मुलगा हमाली करण्याला जातो आणि हातात बॅट पकडता येत नसतांनाही अमित शहांचा मुलगा क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष होतो, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. आपले सरकार आल्यानंतर मुलींप्रमाणे मुलांना देखील मोफत शिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.