लाडक्या बहिणींनी केले औक्षण आणि अभिनंदन
मुंबई, दि.6 : अलोट जनसागराच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पदभार स्वीकारण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी मंत्रालयात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांना अभिवादन केले. दरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे मंत्रालयात आगमन झाल्यावर लाडक्या बहीणींनी औक्षण करून अभिनंदन केले. वैष्णवी जितेंद्र खामकर, मनाली महेश नारकर, शारदा शरद कदम, प्राची प्रफुल्ल पवार, रेखा शेमशोन आढाव या लाडक्या बहिणींनी त्यांचे औक्षण केले तर श्रीमती लिलाबाई चव्हाण व श्रीमती रेणुका राठोड यांनी पुष्पगुच्छ देवून प्रातिनिधीक स्वरूपात राज्यातील लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन केले.