मुंबई/गोंदिया, दि. २८ : अक्षरलिपी या सभ्यता, संस्कृतीचे वाहक असतात. भारतीय संस्कृती प्राचीन आहे, आणि तिच्या विविध लिप्या जिवंत ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा आपला इतिहास विसरला जाईल.” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अच्युत पालव लिखित “अक्षरभारती” या कॅलिग्राफी पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आज जहांगीर आर्ट गॅलरी येथे करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नवनीत प्रकाशनाचे संचालक अनिल गाला, अच्युत पालव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पद्मश्री श्री.पालव यांचे सर्वांसमोर कौतुक करताना म्हटले की, “ते अक्षर कलेला सर्वत्र पोहोचवतात आणि अनेक लोकांना या कलेमध्ये समाविष्ट करतात.”
मुख्यमंत्र्यांनी अक्षर कलेच्या महत्त्वावर भाष्य करताना सांगितले की, कोणत्याही व्यक्तीला चांगले अंक गाठायचे असतील, तर त्यांचे अक्षर चांगले असणे आवश्यक आहे. एक मोठा ज्ञानाचा खजिना देखील या अक्षरांच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत पोहोचत असतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी श्री.पालव यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.