ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक डॉ. दत्ता भगत यांना या वर्षीचा अ.का. प्रियोळकर पुरस्कार प्रदान

0
11

मुंबई विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

अभिव्यक्ती स्पर्धांसह आणि विविध उपक्रमांचे आयोजन

मुंबई, २७ फेब्रुवारी: मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक प्रयत्न करणारे ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा आणि साहित्य भवन, विद्यानगरी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या वतीने यावर्षीचा प्रा अ. का. प्रियोळकर पुरस्कार ज्येष्ठ संशोधक पुरस्कार नाटककार,साहित्यिक व समीक्षक डॉ. दत्ता भगत यांना प्रदान करण्यात आला. डॉ. दत्ता भगत हे ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, समीक्षक आणि व्याख्याते आहेत. वाटा-पळवाटा, आवर्त, अश्मक, खेळिया आणि जहाज फुटलं आहे अशी विविधांगी साहित्यकृती त्यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याचा यथोचित गौरव मुंबई विद्यापीठाच्या वतीने करण्यात आला. त्याचबरोबर उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार डॉ. नेहा सावंत यांना ‘कुपारी बोलीतील साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या संशोधनासाठी प्रदान करण्यात आला. यावर्षीपासून मराठी विभागाच्या मार्फत सुरु करण्यात आलेल्या राजकवी भाष्करराव तांबे पुरस्काराने मराठी विभागात सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या निखिल बागडे या विद्यार्थ्यांस सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामदास भटकळ आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दत्ता भगत यांनी मराठी भाषा गौरव दिनी मुंबई विद्यापीठाच्या प्रा.अ. का. प्रियोळकर पुरस्काराने आपला सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भाषेच्या गौरव दिनाबरोबरच भाषेच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणूनही या दिवसाला महत्व असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामदास भटकळ यांनी ‘मराठी भाषाः स्वरूप आणि वाटचाल’ यावर प्रकाश टाकला. भाषा म्हणजे केवळ प्रमाण भाषा नव्हे, तर सर्वच भाषांचे महत्व सारखेच असल्याचे सांगितले. शिक्षण असो की संस्कृती ज्यामध्ये जितके जास्त पर्याय असतील तितके महत्वाचे, कोणताही एक पर्याय महत्वाचा असे म्हणणे संयुक्तिक नसल्याचे सांगत त्यांनी विकेंद्रीकरणावर जोर देऊन जितके जास्त पर्याय शोधता येतील तितके ते समृद्ध होत जाईल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या ‘भारतीय भाषा संवर्धन व प्रसार केंद्रा’च्या माध्यमातून अभिजात मराठी भाषेतील दर्जेदार साहित्यकृती इतर भाषेत भाषांतरित करणे, इतर भाषांतील उत्तमोत्तम साहित्य मराठी भाषेत भाषांतरित करणे, त्याचबरोबर बोलीभाषांना संगणकीय सहाय्याच्या माध्यमातून वृद्धींगत करणे असे अनुषंगिक उपक्रम या केंद्राच्या माध्यमातून राबविले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आणि मातृभाषेचा गौरव म्हणून मुंबई विद्यापीठात २४ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘अभिव्यक्ती: उत्सव आपल्या माय मराठीचा’ या कार्यक्रमाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये स्वरचित काव्यवाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, अभिवाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये मुंबई विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. विनोद कुमरे यांनी केले. सूत्र संचालन डॉ. सुनिल अवचार आणि पाहुण्यांचा परिचय प्रा. अनिल सकपाळ यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रा. वंदना महाजन यांनी आभार मानले.