आईचा मुलाबरोबर होणारा भावनिक संवाद हीच खरी मातृभाषा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

0
15
जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. तारा भवाळकर यांचा केला सत्कार
सांगली, दि. 5 : आपली संस्कृती विविध भागांना जोडणारी आहे. संस्कृती ही सुई दोऱ्यासारखी असते, ती जोडणारी असते. आईचा मुलाबरोबर होणारा भावनिक संवाद हीच खरी मातृभाषा असते. शब्द हे नंतर त्याच्यातून आकार घेत असतात. आपली संस्कृती सर्वांनी जपली पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचा सत्कार जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या भावस्पर्शी कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक रितू खोखर, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, मा. पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उज्ज्वला परांजपे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. तारा भवाळकर यांना उत्तम आरोग्याबरोबर दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी डॉ. तारा भवाळकर यांनी आपली भाषा, संस्कृती याबद्दल विविध उदाहरणे दिली. भाषा टिकविण्यासाठी ती कृतीमध्ये आली पाहिजे असे सांगून त्या म्हणाल्या, भाषा टिकविण्यासाठी ती दैनंदिन ऐकणे, बोलणे महत्वाचे आहे. लोकसंस्कृतीतून समाजाचा इतिहास कळतो. सध्या पाहिले तर समाजाच्या तळागाळापर्यंत आपल्या मातृभाषेच्या बोलण्यामधील शब्दात इंग्रजीची भेसळ झालेली आहे. विविध भागातील संस्कृती वेगवेगळी असते. माणसांना एकमेकांशी बांधायचे झाले तर भाषेशिवाय दुसरे साधन नाही. आपल्या भाषेमध्ये व शैलीमध्ये बोलायला लागलो तर आपलेपणा निर्माण होतो. शब्दाने माणूस जोडला जातो. परंतु तो कुठे, किती व कसा वापरावयाचा हे कळले पाहिजे असे त्या म्हणाल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नेहमीच सहकार्य केले असल्याचे सांगून त्यांनी त्यांच्या सत्काराबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी खासदार विशाल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी मनोगत व्यक्त करून डॉ. तारा भवाळकर यांनी सांगलीचे नाव देश व परदेशात नेल्याचे सांगून त्यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन तहसिलदार लिना खरात यांनी केले.