मुंबई विद्यापीठात महिला कर्तृत्वाचा गौरव सोहळा

0
35

मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर कॉर्नेलिया सोराबजी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवार्थ राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

मुंबई, दि. 16 मार्चः मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर तसेच भारतातील पहिल्या महिला वकील कॉर्नेलिया सोरोबजी यांच्या वकिलीच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि विविध क्षेत्रांतील पहिल्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आज मुंबई विद्यापीठात महिला कर्तृत्वाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. ‘ब्रेकिंग ग्लास सिलिंगः वुमन हू मेड इट’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक या कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी होत्या. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, परिसंवादाच्या निमंत्रक प्रा. कविता लघाटे यांच्यासह बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे, मानदेशी फाऊंडेशनच्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा, इन्फ्लिबनेटच्या संचालिका प्रा. देविका मदाली, बालरोग तज्ज्ञ ज्योत्सना किर्तने, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता हळदेकर, सीमा सिंह आणि गीताताई गुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला यावेळी उपस्थित होत्या. मुंबई विद्यापीठ, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद पश्चिम विभागीय केंद्र, श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, प्रा. बाळ आपटे विद्यार्थी व युवा चळवळी अभ्यास केंद्र आणि लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, महिलांनी कायम कृतीयोग्य ध्येयांसाठी काम केले पाहिजे. महिलांना मातृत्व आणि कामातील संतुलन साधताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी त्यांना पिता, बंधू आणि पती यांचा आधार मिळाला पाहिजे. भारताच्या पहिल्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अण्णा चांडी, केरळ उच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश फातिमा बीवी आणि अशा असंख्य महिलांनी अधिक कठीण लढा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. मागे वळून पाहिल्यास असे लक्षात येते की महिलांनी मोठी प्रगती केली आहे. महिलांना सक्षम करण्यात मुंबई विद्यापीठाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुंबई विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीवर नजर टाकल्यास, विविध क्षेत्रांतील अनेक कर्तृत्ववान महिला ह्या या विद्यापीठात घडल्या आहेत. आज प्रगती तीन घटकांच्या आधारे मोजली जाऊ शकते. पहिला घटक म्हणजे महिलांचा व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश, दुसरा म्हणजे, ज्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्यांनी लढा दिला, त्या क्षेत्रात किती महिला टिकून राहतात आणि तिसरा म्हणजे, किती महिला पुढे जाऊन सत्तापदांपर्यंत पोहोचतात असेही न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी म्हणून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तरुण महिलांना स्वप्न पाहण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आणि जीवनात त्यांचे योग्य स्थान मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले. एक कर्तृत्ववान महिला अनेक महिलांसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझ्या स्वतःच्या प्रवासात, सार्वजनिक प्रशासनात महिलांची बदलती भूमिका स्वतः प्रत्यक्ष पाहिली असल्याचे सांगत, आव्हाने अजूनही असली तरी संधीही असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना सक्षम करणारी धोरणे, समान संधींना प्रोत्साहन देणारी धोरणे आणि प्रगतीला अडथळा आणणारे अडथळे दूर करणाऱ्या धोरणांचा स्विकार करून पुढील वाटचाल करूया असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. लंडनमधील सोमरविले कॉलेजमधील भेटी दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर तसेच भारतातील पहिल्या महिला वकील कॉर्नेलिया सोरोबजी यांच्या कार्यकर्तृत्वाची महती सर्वांपर्यत पोहचावी तसेच हा समृद्ध वारसा अनेक पिढ्याना प्रेरणा देत राहावा या व्यापक दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित केला गेला असून, अशा कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत राहावी यासाठी नजीकच्या काळात अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिसंवादाच्या निमंत्रक प्रा. कविता लघाटे यांनी केले.

उदघाटन सत्रानंतर इन्फ्लिबनेटच्या संचालिका प्रा. देविका मदाली यांच्या निरीक्षणात महिला नैसर्गिकरित्या अनेक कामे एकाच वेळी करीत असून त्या अधिक समजूतदार असल्याचे नमूद केले. महिला सक्षमीकरण म्हणजे पुरुषांचाही सहभाग अपेक्षित असून जग बदलण्यासाठी आपण हातात हात घालून चालले पाहिजे असेही यावेळी नमूद करण्यात आले. डॉ. ज्योत्स्ना किर्तने यांनी आनंदीबाई जोशी, कादंबिनी गांगुली आणि रखमाबाई राऊत या तीन महिला डॉक्टरांची यशोगाथा सांगितली. दुपारच्या सत्रात अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित नाटक आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित “ज्योती, द फ्लेम” हा चित्रपट दाखवण्यात आला. दुपारच्या सत्रातील इतर वक्त्यांमध्ये मानदेशी फाउंडेशनच्या चेतना गाला सिन्हा, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता हळदेकर, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करणाऱ्या मेघश्रय फाउंडेशनच्या सीमा सिंह आणि भारतीय स्त्री शक्ती आणि दृष्टि स्त्री अध्यायन प्रबोधन केंद्राच्या विश्वस्त श्रीमती गीता गुंडे यांचा समावेश होता.