राज्यात दुष्काळाची स्थिती 2012 पेक्षाही गंभीर

0
6

मुंबई- केंद्र सरकारमधील कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवेश शर्मा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने गेली दोन दिवस राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील जवळपास निम्मी नावे दुष्काळाच्या विपरीत प्रभावाखाली आहेत व 2012 च्या दुष्काळापेक्षाही ही स्थिती गंभीर आहे असा निष्कर्ष केंद्रीय पथकाने पाहणीनंतर काढला आहे.

राज्य सरकारने मागील महिन्यात 19 हजार गावांची 50 टक्केपेक्षा कमी आणेवारी आल्याने दुष्काळग्रस्त जाहीर केले होते. त्यात आता केंद्रीय पथकाने नव्याने पाहणी केल्यानंतर सुमारे 5 हजार 700 गावे वाढविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शर्मा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. 2012 च्या दुष्काळाच्या तुलनेत दुप्पटीने जास्त गावे ह्यावेळी बाधित झाली असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

परिस्थिती भीषण असताना देखील दुष्काळी स्थितीला राज्य सरकारच्या यंत्रणेमार्फत दिल्या जात असलेल्या प्रतिसादाबद्दल केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मेमोरँडम पाठवून आर्थिक मदतीविषयी अगोदरच मागणी केली आहे. त्यामध्ये 19 हजार गावांचा समावेश असून 3925 कोटी इतकी मागणी केली होती. आता मात्र नव्याने अंतिम आणीवारीनंतर गावांची संख्या (सुमारे 5700 गावे) वाढण्यात येणार आहेत. त्या सर्व गावांचा समावेश अंतिम अहवालात करण्यात येणार असून, सुधारित मेमोरँडम पाठवल्यानंतर केंद्र सरकारची उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मदतीबाबत अंतिम निर्णय होईल.

सध्या मागणी केलेल्या रक्कमेमध्ये निव्वळ शेतीच्या नुकसानीचा अंतर्भाव आहे. पण भविष्यात चारा टंचाई, पाणी टंचाई ह्यासाठी अधिक रक्कम लागल्यास त्याचाही विचार केंद्र शासनामार्फत करण्यात येणार आहे. धान्याची गरज भासल्यास अतिरिक्त धान्य किफायतशीर दरात उपलब्ध करुन देणे शक्य असल्याचेही केंद्रीय पथकाचे म्हणणे आहे. ह्या बाबींसाठी आवश्यकतेनुसार सुधारित मेमोरँडम राज्य सरकारला पाठविण्याच्या सूचना केंद्रीय पथकाने दिल्या आहे.

केंद्रीय पथकाला राज्याच्या दुष्काळ भागातील दौऱ्यादरम्यान राज्यातील गंभीर स्थितीची गंभीर कल्पना आली आहे. केंद्र सरकारला सादर करण्यात येणाऱ्या अहवालात अधिकाधिक मदत मिळण्याचे दृष्टीने शिफारस करण्याची हमी प्रवेश शर्मा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मेमोरँडम प्राप्त झाल्यावर त्वरेने राज्यास भेट देऊन तपशीलवार पाहणी केल्याबद्दल केंद्रीय पथकाचे राज्य सरकारने आभार मानले आहेत.