हिंदु धर्मांतरणाचा कार्यक्रम हाती घ्यावा- निलेश राणें

0
8

मुंबई- सिडनी शहरात घडलेल्या घटनेसारख्या घटना जगभर सतत कोठे ना कोठे होत असतातच. भारताने मात्र जास्तीत जास्त लोकांना हिंदु धर्म स्वीकारायला भाग पाडण्यावर लक्ष केंद्रीत करावे असे मत काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी टि्वटवर मांडले आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष संसदेत आग्रा धर्मांतरण मुद्यावरून सत्ताधारी भाजपच्या तोंडाला फेस आणत असताना राणेंनी केलेल्या टि्वटमुळे चर्चा रंगली आहे.

सिडनीत सोमवारी एका व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून लिंट कॅफेतील 15-20 लोकांना ओलीस धरले होते. याबाबत टि्वट करताना राणेंनी यावर भाष्य केले आहे. जगात सिडनीसारख्या घटना सर्वत्रच घडत असतात. आपल्याला हे टाळायचे असेल, तर भारताने जास्तीत जास्त लोकांचे हिंदुंमध्ये धर्मांतर करण्यावर भर दिला पाहिजे, असे म्हटले आहे.

या ट्विटनंतर निलेश यांनी पाकिस्तानातील पेशावर हल्ल्याचाही निषेध केला आहे. निरागस मुलांवर केलेल्या हल्ल्याची घटना लांच्छनास्पद आहे. इतकी खालच्या दर्जाचे व दुखद क्रौर्य ते करूच कसे शकतात. तालिबानला संपवा. हीच वेळ योग्य आहे’ असे टि्वट केले आहे.

याविषयी माध्यमांनी राणेंना विचारले असता त्यांनी धर्मांतरणाचे समर्थन केले आहे. निलेशचे म्हणणे आहे की, उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या सामूहिक धर्मांतरणात काहीही चुकीचे नाही. या लोकांचे बळजबरीने धर्मांतर केले जात नाही. त्यामुळे त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. याकडे काँग्रेस किंवा भाजप अशा राजकीय पक्षाच्या भूमिकेतून पाहू नये. मी काँग्रेसचा कार्यकर्ता असलो तरी ते माझे व्यक्तिगत मत आहे. मी कोणत्याही धर्माच्या व जातींच्या विरोधात व बाजूने नाही. सर्व हिंदू एकत्र उभे राहिल्यास दहशतवादासारख्या घटना घडणारच नाहीत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी हिंदू धर्म सक्षम आहे अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे.