विधिमंडळ सचिवालयाकडून आता ए. बी. बर्धनांचा सत्कार

0
13

नागपूर-ज्येष्ठ पत्रकार व विधिमंडळाचे माजी सदस्य मा. गो. वैद्य यांच्या सत्कारावरून थोडा टीकेचा सूर उमटल्यानंतर आता विधिमंडळ सचिवालयाने कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.बी. बर्धन यांचा सत्कार करण्याचे ठरविले आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात हा सत्कार होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर येथे सुरू असलेले हे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ सचिवालयाने तसेच वि.स. पागे संशोधन प्रशिक्षण केंद्राच्यावतीने मा.गो. वैद्य यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधिमंडळात प्रथमच प्रवेश करणाऱ्या नवीन आमदारांना तसेच विद्यमान आमदारांना जुन्याजाणत्या सदस्यांच्या कार्याचा परिचय व्हावा, या उद्देशाने हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या मा.गो. वैद्यांचा सत्कार आयोजित झाल्याने तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
वैद्य यांच्या विद्वत्तेविषयी काहीही वाद नाही, पण केवळ त्यांचाच सत्कार का? असा प्रश्न काही आमदारांनी तसेच माजी सदस्यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे उपस्थित केला.
विधिमंडळात प्रभावी कामगिरी बजावणारे अनेक जाणते सदस्य विदर्भात आहेत. त्यांचाही सत्कार व्हावा, अशी अपेक्षा या सर्वानी व्यक्त केली होती. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी सचिवालयाला सत्कारासाठी आणखी काही नावांचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर आता सचिवालयाने ए.बी. बर्धन यांचा सत्कार करण्याचे ठरवले आहे. बर्धन यांच्या सत्कार कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून या कार्यक्रमाची आखणी सध्या केली जात आहे.
अधिवेशन शेवटच्या टप्प्यात असताना हा कार्यक्रम होईल, अशी माहिती विधिमंडळातून मिळाली. वैद्य यांच्या पाठोपाठ बर्धन यांचा सत्कार झाला तर समतोल साधला जाईल, असे सांगण्यात आले. १९५८ ते १९६२ या काळात बर्धन विधिमंडळाचे सदस्य होते. जाणते कम्युनिस्ट नेते म्हणून सध्या त्यांना देशभरात ओळखले जाते.