‘स्वच्छ भारत अभियान’चे पथकच लाचेच्या सापळ्यात

0
28

औरंगाबाद,दि.२२- : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत औरंगाबाद शहरात पाहणी करण्यासाठी आलेले पथकच लाचेच्या जाळ्यात अडकले. महापालिकेच्या बाजूने सकारात्मक रिपोर्ट देण्यासाठी या पथकाने

चक्क महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच एक लाख सत्तर हजार रुपये लाच घेतली. मात्र महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या दक्षतेमुळे हे त्रिसदस्यीय पथक एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लाच घेताना पकडले गेले. विशेष म्हणजे पकडण्यात आलेले लाचखोर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातीलच आहेत.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत आलेल्या पथकातील शैलेश बंजानिया , विजय जोशी आणि गोविंद गिव्हारे (सर्व राहणार सूरत, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या समन्वयक जयश्री कुलकर्णी, घनकचरा विभागाचे सहायक अधिकारी प्रमोद खोब्रागडे यांनी ही बाब उपायुक्त अय्युब खान यांच्या कानावर घातली. खान यांनी त्वरित बकोरिया यांना सांगितले. आयुक्तांनी इच्छा नसतानाही परवानगी दिली. रात्री उशिरा पथकातील सदस्यांनी मनपा अधिकाऱ्यांचा छळ सुरू केला. तुमचे शहर खूपच घाण आहे, तुम्हाला चांगला ‘पॉझिटिव्ह रिपोर्ट’ हवा असेल तर आम्ही मदत करायला तयार आहोत. आम्हाला अडीच लाख रुपयांची रक्कम द्यावी लागेल, अशी थेट लाच मागितली.आयुक्त बकोरिया यांना हा प्रकार समजताच त्यांनी नगरविकास विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.