मुंबई आणि ठाणे वगळता सर्वच महापालिकांमध्ये भाजप नंबर वन

0
6

मुंबई,दि. 23 : मुंबई आणि ठाणे वगळता राज्यातील 10 महापालिकांपैकी 8 महापालिकांमध्ये भाजपने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. भाजपने मुंबई आणि ठाणे सोडून नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती आदी महापालिकांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे.
मुंबई महापालिकेत भाजपला चांगले यश मिळाले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे केवळ 31च नगरसेवक होते. पण शिवसेनेने युती तोडल्यानंतर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. सध्या भाजपचे 77 जागांवर आघाडी मिळवली आहे.
मुंबईजवळच्याच उल्हासनगर महापालिकेत भाजपची सरशी झाली आहे. या निवडणुकीत भाजपने पप्पू कलानी यांच्यासोबत आघाडी केल्याने, भाजपवर चहूबाजूंनी टीका होत होती. पण इथे भाजपची सरशी होऊन भाजप आघाडीला 33 जागांवर विजयी आघाडी मिळाला आहे.तर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या नाशिक महापालिकेत भाजपने राज ठाकरेंच्या मनसेकडून सत्ता अक्षरश: हिसकावून घेतली आहे. गेल्या निवडणुकीत नाशिक महापालिकेत मनसेचे 40 तर भाजपचे केवळ 14 नगरसेवक होते. पण यंदा भाजपने 40 जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे. तर मनसेच्या इंजिनाला मोठा ब्रेक लागला आहे. मनसेच्या सध्या तीनच उमेदवारांनी आघाडी मिळवली आहे.
भाजपने सर्वाधिक मुसंडी ही पुणे महापालिकेत मारल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीत पुणे महापालिकेमध्ये भाजपचे फक्त 26 च नगरसेवक होते. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपने 77 जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे. पुण्यात सध्या भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.
तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धोबीपछाड दिला आहे. भाजपचे गेल्या महापालिका निवडणुकीत केवळ 3 नगरसेवक होते. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपने सध्या 31 जागांवर आघाडी मिळवली आहे.पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर महापालिकेतही भाजपने काँग्रेसचा दणकून पराभव केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण या निवडणुकीत भाजपने 28 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसचे 11 उमेदवार आघाडीवर आहेत.
तिकडे विदर्भातही भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. नागपूर महापालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. पण भाजपनं आपलं पुन्हा एकदा नागपूर महापालिकेवर वर्चस्व सिद्ध केलं आहे. भाजपनं गेल्या निवडणुकीत 62 जागांवर विजय मिळवला होता. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपने 48 जागांवर आघाडी मिळवली आहे.यासोबतच अमरावती महापालिकेवरही भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे. सध्या भाजपने 30 जागांवर आघाडी मिळवलेली आहे. तसेच अकोला महापालिकेतही भाजपला यश मिळालं आहे. भाजपने 36 जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे.