स्थानिक स्वराज्यसाठी भाजपाचे ‘स्वबळ’

0
19

मुंबई- राज्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजापा स्वबळावर लढेल असे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. या निवडणुकांमध्ये युती करायची की नाही याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पदाधिका-यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जर त्यांना स्वबळावर लढायचे असेल तर भाजपा स्वबळावर लढेल असेही त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारां बरोबर बोलत होते. यातून त्यांनी एकप्रकारे शिवसेनेला ठेंगा दाखवत सुचक इशारा दिला आहे.
शिवसेना सत्तेत सहभागी झाली असली तरी भाजपा त्यांना गीणतीत पकडायला तयार नाही. यापुढे राज्यात भाजपाच्याच तालावर शिवसेनेला नाचावे लागेल अशीच रणनिती आखली गेली आहे. त्याचाच प्रत्यय गुरूवारी आला.
भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदभार स्वीकारताच सर्वात पहिला हल्ला शिवसेनेवरच केला. राज्यात यापुढे शतप्रतिशद भाजपाचे उद्दीष्ठ डोळ्या समोर ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले. येवढेच नाही तर स्थानिक कार्यकर्त्यांला यापुढे ताकद देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी काळात राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका भाजपा स्वबळावर लढेल असे संकेत दिले आहेत. शिवाय या बाबतचा निर्णय घेण्याचे अधिकारही स्थानिक नेत्यांना दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने मिशन १०० प्लस हाती घेतले आहे. त्याला त्यांच्या या वक्तव्याने बळकटी मिळणार आहे. त्यामुळे दानवे यांनी सुरूवातीपासूनच शिवसेनेवर दबाव टाकण्याची रणनिती यातून आखल्याचे स्पष्ट आहे. दानवे ज्या आक्रमकतेने शिवसेनेला आव्हान देत आहेत तीच पद्धत यापुढेही कायम राहीली तर ती शिवसेनेसाठी धोक्याची घंटा असेल.
रावसाहेब दानवे राजिनामा देणार
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रावसाहेब दानवे हे केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजिनामा देणार आहेत. काही दिवसात दिल्लीला जावून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजिनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे पक्ष बांधणीचे काम करणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. सरकार आणि जनता यातील दुवा बनवण्याच आपला प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.