संग्राम चौगुले ठरला ‘तरुण भारत श्री’

0
15

सांगली- सिक्‍स पॅक, एट पॅक, ट्रायसेप, बायसेप हे सारं दाखवणारं पीळदार शरीरयष्टीचे बॉडी बिल्डर्स… डिजेच्या तालावरील पोझेस्‌…रॉम्प वॉकिंग… प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडियम…टाळ्यांचा कडकडाट अन्‌ जल्लोष…रात्रीच्या बोचणाऱ्या थंडीत सांगलीकरांनी हा आनंद अनुभवला. निमित्तं होते “तरुण भारत श्री‘ या मानाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेचे.
तरुण भारत व्यायाम मंडळतर्फे झालेल्या स्पर्धेत पिळदार शरीरयष्टी व आकर्षक पोझेसच्या जोरावर पिंपरी-चिंचवडच्या संग्राम चौगुले याने “तरुण भारत श्री‘ मानाचा किताब पटकावला. तर बेस्ट पोझर चंद्रशेखर पवार व मोस्ट इम्प्रूव्हड बॉडी बिल्डर म्हणून जगदीश लाड यांची निवड झाली. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन व जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या स्पर्धेत राज्यभरातून दीडशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. 55, 60, 65, 70, 75, 80, 85 आणि 85 वरील खुला अशा आठ वजनी गटात ही स्पर्धा झाली. प्रत्येक गटातील पहिल्या पाच खेळाडूंनी रोख पारितोषिके देण्यात आली.
आठ वर्षांच्या खंडानंतर झालेली ही स्पर्धा तरुण भारत मंडळाने चांगलीच गाजवली. “मिस्टर वर्ल्ड‘ स्पर्धेत सहभागी झालेला संग्राम चौगुले, जगदीश लाड, स्वप्नील नरवाडकर, महेश वरम, सुनीत जाधव, सागर माळी यांचे खास आकर्षण होते. जगदीश लाड याने संग्राम चौगुले याला कडवी टक्कर दिली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशावाह, भाजपचे गोपीचंद पडळकर, क्रीडा संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते झाले.
ऍड. विक्रम रोटे, मुरली वस्त्स, राजेंद्र हेंद्रे, अश्‍विनी बगाडे-हेंद्रे, राजेश वडाम, रामचंद्र साबळे, इनायत तेरदाळकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे संयोजन तरुण भारत व्यायाम मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सगरे, उपाध्यक्ष ज्ञानेश कांबळे, खजिनदार प्रमोद जगताप, कार्यवाह महेश पाटील, प्रताप जाधव, राजीव जोशी, दीपक साठे, सुरेश चव्हाण, अनिल थोरात, लक्ष्मण अप्पा मोने, प्रकाश सूर्यवंशी, इलाही बिडीवाले, पारिसा नागे, अभय खाडिलकर, भगवान शिंदे यांनी केले.

स्पर्धेचे निकाल असा
* 55 किलो – सुनील सकपाळ (मुंबई), किशोर कदम (मुंबई), योगेश दिमटे (पुणे), नितीन शिगवण (मुंबई), शिरीष कणसे.
* 60 किलो – रामा मायनाक (सातारा), नितीन म्हेत्रे (मुंबई), अरुण पाटील (मुंबई), कुलदीप डेंगे (कोल्हापूर), उमेश पांचाळ (मुंबई)
* 65 किलो – स्वप्नील नरवाडकर (मुंबई), विलास घडवाले (मुंबई), तौसिफ मोमीन (पुणे), जगेश दैत (मुंबई), आशिष माने (पुणे)
* 70 किलो – चंद्रशेखर पवार (कोल्हापूर), श्रीनिवास वास्के (मुबंई), श्रीनिवास खारवे (मुंबई), फैयाज शेख (सातारा), किशोर क्षीरसागर (पिंपरी-चिंचवड)
* 75 किलो – संदीप कडू (मुंबई), शोएब पीरजादे (पुणे), वहीद मुलाणी (सांगली), सौरव साळुंखे (मुंबई), रवींद्र जगदाळे (कोल्हापूर)
* 80 किलो – सच्चिंद्र सिंग (मुंबई), अभिषेक खेडेकर (मुंबई), गौतम शिर्के (सांगली), शहाजी चौगुले (कोल्हापूर), वैभव वनगडे (कोल्हापूर)
* 85 किलो – जगदीश लाड (मुंबई), सुमित जाधव (मुंबई), अनिकेत गवळी (कोल्हापूर), मुज्जफर शेख (पुणे), रसलम नायकवडी (कोल्हापूर).
* खुल्या गट – संग्राम चौगुले (पिंपरी चिंचवड), महेंद्र चव्हाण (पुणे), देवधर बोहीर (मुंबई), नीलेश दांगडे (मुंबई), सागर शिंदे (सातारा)

मलेशियाच्या महिला बॉडी बिल्डरची हजेरी
मलेशियाची महिला बॉडी बिल्डर मिस फ्रान्सिस्का हिने उपस्थिती लावली. तिनेही डीजेच्या तालावर प्रात्यक्षिके करून दाखवली. पुरुषांच्या मानला जाणाऱ्या शरीरसौष्ठव खेळात एक महिला उत्तमरीत्या बॉडी बिल्डिंग करते, हे पाहून उपस्थितांनी आश्‍चर्य व्यक्त केले. ही मलेशियाची खेळाडू आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी होणार आहे. सध्या ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मुलींनीही खेळाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघावे, असा तिने संदेशही दिला. उपस्थित मान्यवरांनी तिचे कौतुक करून बक्षिसेही दिली.