डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेची व्याप्ती वाढवली

0
12

मुंबई दि. २० : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून आता यामध्ये भारतीय वन्यजीव संस्थान यांनी निश्चित केलेल्या वन्यप्राणी भ्रमण मार्गामधील गावे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यानामधून पुनर्वसन झालेली गावे तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २८ अंतर्गत स्थापित ग्रामवने योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. यासंबंधीचा शासन निर्णय वन विभागाने दि. १७ जुलै २०१७ रोजी निर्गमित केला आहे.
राज्यातील अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प क्षेत्राच्या बफर क्षेत्रामधील वनालगतच्या गावांमध्ये तेथील जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास करून उत्पादकता वाढवणे, गावकऱ्यांची वनावरील निर्भरता कमी करणे, शेतीला पूरक जोडधंद्यांची निर्मिती करणे, पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे यातून मानव आणि वन्यप्राणी संघर्ष कमी करणे यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबविली जाते.
ही योजना आतापर्यंत व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावे, राष्ट्रीय उद्यान अभयारण्यातील व त्याच्या सीमेपासून २ कि.मी च्या आत येणारी गावे यांच्यासाठी राबविण्यात येत होती. आता या योजनेची व्याप्ती वाढवून ती राज्यातील व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या कॅरिडोरमधील गावे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यानातून पुनर्वसित केलेली गावे, भारतीय वन अधिनियम १९२७ कलम २८ अंतर्गत स्थापित ग्रामवने यामध्ये देखील राबविली जाईल.
हा शासननिर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक २०१७०७१७१२४९४४२२१९ असा आहे.