आमदारांच्या स्वीय सहायकांसाठी एक दिवसीय अभ्यासवर्ग

0
11

मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि संसदीय कार्य विभाग, मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विधीमंडळ सदस्यांच्या-आमदारांच्या स्वीय सहायकांसाठी रविवार, दिनांक २३ जुलै, २०१७ रोजी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे.
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद उप सभापती माणिकराव ठाकरे, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या मार्गदर्शनाने या अभ्यावर्गाचे उद्घाटन होईल.
यावेळी निलेश मदाने, संचालक, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांचे संकलन व लेखन असलेल्या ‘लोकप्रतिनिधींसाठी लोकसंपर्क- स्वीय सहायकांची कर्तव्ये आणि जबाबदारी’ या पुस्तिकेचे (Hand Book) प्रकाशन मुख्यमंत्री, पीठासीन अधिकारी, संसदीय कार्यमंत्री यांच्या हस्ते आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या अभ्यासवर्गात स्वीय सहायकांसाठी डॉ. अनंत कळसे, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, (संसदीय लोकशाही प्रणालीत विधिमंडळ कामकाजाचे महत्व) उत्तमसिंग चव्हाण, सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विविध संसदीय आयुधे) आणि ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार (विधिमंडळ कामकाज, मतदारसंघातील विकासकामे आणि प्रसिध्दीकार्य) यांची व्याख्याने होतील. सर्व स्वीय सहायकांनी अभ्यासवर्गास उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र विधान मंडळाचे प्रधान सचिव, डॉ. अनंत कळसे यांनी केले आहे.