नांदेडच्या युवकांचा धबधब्यात बुडून मृत्यू

0
12

वाढदिवसाची पार्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता
नांदेड,दि.24-जळगाव (एनएनएल) जिल्ह्यातील चाळीसगाव येथील हिरापूररोड जवळ असलेल्या ग्राम शक्ती फायनान्स कंपनीचा २७ वर्षीय तरुणाचा आज तालुक्यातील पाटणादेवी येथील पितळखोरे जवळ असलेल्या धवलतीर्थ धबधब्याच्या कुंड्यात पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारच्या सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली असून, मयत तरुण नांदेड जिल्ह्यातील असून, वाढदिवसाच्या पार्टीसाठी १० मित्रांसोबत तो धबधब्याजवळ गेल्याचे सांगण्यात आले. 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार योगेश राजेश्वर भोरे (२७) रा कुंडलवाडी, ता बिलोली, जि नांदेड हा तरुण चाळीसगाव येथील हिरापूर रोडवरील ग्रामशक्ती फायनान्स मध्ये नोकरी करतो. यासाठी तो चाळीसगाव येथे राहत असे, दि.२१ जुलै २०१७ रोजी त्याचा वाढदिवस असल्याने त्यानिमित्त व आज रविवारी सुटी असल्याने कामावरील जवळपास १० मित्रांसमवेत चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगलात असलेल्या पितळखोऱ्या जवळील धवलतीर्थ कुंड धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेला होता. वरील धबधब्याच्या पाण्याच्या धारेखाली बसलेला असताना सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पाण्याचा प्रवाह जोरात आल्याने योगेश भोरे हा धवलतीर्थ कुंडात पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागून तो पाण्यातील कुंडात बुडाला. कुंडात खोल पाणी असल्यामुळे तो लवकर सापडला नाही. शोध घेतल्यानंतर सापडला नसल्याने अखेर वनविभाग व पोलीस कर्मचाऱ्यांना तेथे पाचारण करण्यात आले. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन चे सहायक फौजदार संजय काळे, हवालदार दिलीप रोकडे, पोलीस नाईक दत्तात्रय महाजन, नितीन आमोदकर, वन विभागाचे कैलास राठोड, खडकी बु चे शकील खान, गोकुळ कोल्हे व पाटणा गावातील ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह अथक परिश्रामांनंतर ७ वाजेच्या सुमारास बाहेर काढला.