‘कॉमन मॅन’चे स्मारक उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा!

0
11

पुणे – ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पार्थिवावर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांना मुखाग्नी देण्यात आला. त्याआधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आर. के. लक्ष्मण यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली.

दरम्यान, त्याआधी मान्यवर नेतेमंडळींसह राजकीय-सामाजिक क्षेत्रासह कार्टून व कला माध्यमातील मान्यवरांसह हजारो नागरिकांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सोमवारी, 26 जानेवारी रोजी वयाच्या 94 व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात आर. के. लक्ष्मण यांचे निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर सोमवारी सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक उत्कृष्ट राजकीय आणि सामाजिक जाणीव असलेला व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशात ओळख होती. त्यांनी रेखाटलेला कॉमनमॅन आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. 60 वर्षाहून अधिक काळ त्यांनी व्यंगचित्रकाराची भूमिका पार पाडली. देशातील राजकीय, सामाजिक स्थितीचे उपहासात्मक पण विचार करायला भाग पाडणारे चित्रण नेहमीच आर.के.लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांत दिसून येत असे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आर.के. लक्ष्मण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हेही पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.