धार्मिक तेढ संपल्यावरच भारताची प्रगती – ओबामा

0
7

नवी दिल्ली, दि. २७ – धर्माच्या आधारे होणारे विभाजन थांबल्यावरच भारताची प्रगती होऊ शकेल असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले आहे. धर्म किंवा अन्य कशाच्याही आधारे दुफळी निर्माण करण्याच्या प्रयत्नांपासून आपण सतर्क राहणे गरजेचे असून प्रत्येकाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार द्यायलाच हवा असे ओबामांनी नमूद केले.
दिल्लीतील सिरी फोर्ट येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी विद्यार्थ्यांची मनमोकळा संवाद साधला. भारत आणि अमेरिका हे एकमेकांचे चांगले साथीदार बनू शकतात आणि भारतातील गरिबी दूर करण्यासाठी अमेरिका मदत करेल अशी ग्वाही ओबामा यांनी दिली. भारत आणि अमेरिकेतील नागरिक मेहनती असून शिक्षण क्षेत्रात आपण एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. भारतातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेत येण्यापेक्षा अमेरिकेच्या जास्तीत जास्त लोकांनी भारतात आल्यास मला आवडेल असेही त्यांनी सांगितले. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश समान मुल्यांवर चालतात असे सांगत त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचे दाखले दिले. पर्यावरण रक्षणासाठी दोन्ही देशांनी एकत्र काम केले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. ज्या देशांच्या महिला सक्षम त्याच देशाची प्रगती होते, राजपथावर सैन्यातील महिला अधिका-यांचे कौतुक वाटते असे सांगत भारतीय महिलांनी सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले असे सांगत त्यांनी भारताच्या स्त्रीशक्तीचे कौतुक केले. भारतीय तरुणांशी संवाद साधताना ओबामांनी बॉलीवूडचा आधार घेतला डीडीएलजी या चित्रपटातील एका प्रसिद्ध वाक्याचा त्यांनी भाषणात वापर केला.