26 नोव्हेंबर संविधान सन्मान दौडमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे- बडोले

0
8

मुंबई,दि.17ः- संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेबर रोजी आयोजित संविधान गौरव सन्मान दौडमध्ये स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे जाहीर आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले. भारतीय समाजात संविधानाचे असलेले ऐतिहासिक महत्व विद्यार्थी-युवक आणि नागरिकांमध्ये रूजवण्यासाठी यानिमित्त मोठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले. मंत्रालयातील आपल्या दालनात विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत यासंबंधिची बैठक पार पडल्यानंतर ते प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या पत्रकारांसोबत ते बोलत होते.

स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची तत्वे भारतीय संविधानाच्या माध्यमातून रूजवून आदर्श धर्मिनिरपेक्ष समाज उभारण्याचा महामंत्र डॉ. बाबासाहेबांनी भारतीय समाजाला दिला. भारतीय संविधानामुळेच अनेक धर्म, जाती, वंश , भाषा, परंपरा असतानाही, भारतीय समाज आज एकसंघ ठेवण्यात यश आले आहे. जगभरातील देशात यादवी, धार्मिक उच्छाद, गृहयुध्दे, अतिरेकी कारवायांमुळे सामाजिक अस्वस्थता फोफावली असताना भारत मात्र शांतता आणि विकासाच्या दिशेकडे प्रगती करीत आहे. त्यामुळे भारतीय उपखंडासह जागतिक स्तरावर भारतीय संविधानाचे आणि पर्यायाने डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचे कौतुक आणि आदर व्यक्त होत आहे.

विषमताधिष्ठीत भारतीय समाजमन बदलून समताधिष्ठीत समाज घडवण्यात भारतरत्न, घटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर थोर उपकार आहेत. त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्यामुळे त्यांच्यप्रती कृतज्ञता आणि गौरव व्यक्त करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने संविधान गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.