ज्येष्ठ साहित्यिक डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

0
11

जयसिंगपूर,दि.27ःयेथील डॉ. एस. के. पाटील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सदस्यांना नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी एका सुंदर सोहळ्याचा आनंद घेता आला. कार्यक्रमाचे निमित्त होते, सांगली येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांना भारतीय साहित्य आणि वैद्यकीय सेवेतील विशेष कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्याच्या समारंभाचे.सदरच्या जीवनगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक वाचनालय, जयसिंगपूर आणि कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

अध्यक्ष एस. बी. होरे यांनी डॉ. जंबगी यांना शाल व श्रीफळ प्रदान केले तर सौ. संजीवनी सुनील पाटील यांनी रोख रक्कम प्रदान केली.डॉ. बी. ए. शिखरे यांनी प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान केले. जयपाल चौगुले यांनी भगवद् गीता, ब्रम्हविलास पाटील यांनी दिव्य कुराण तर डॉ. बी. टी. पाटील यांनी पवित्र शास्त्र (बायबल) प्रदान केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करतांना वाचनालयाचे कार्याध्यक्ष डी. आर. खामकर यांनी वाचनालयामुळे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सदस्यात चैतन्य फुलत चालल्याचे सांगितले.ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रविणकुमार हेमचंद्र वैद्य यांनी डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांच्या ‘तुझं घर माझं घर’, ‘व्रात्यकथा’, ‘बी. सी. जी. पासून ई. सी. जी. पर्यंत’, ‘पावसाचं वय’, ‘विषय विविधा’ इत्यादी पुस्तकांच्या माहिती बरोबरच त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांचाही गौरवपूर्ण उल्लेख केला.

जीवनगौरव पुरस्कार वितरणात संयोजकांनी काही खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव केला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा हा अनोखा आविष्कार पाहून उपस्थित भारावून गेले. प्रमुख पाहुणे डॉ. बी. ए. शिखरे यांनी त्यांच्या भाषणात डॉ. जंबगी यांच्या सर्व साहित्यकृतींचा गौरवपूर्ण उल्लेख तर केलाच पण ‘तुझं घर माझं घर’ या कथासंग्रहावर त्यांनी सुंदर प्रकाशझोत टाकला. सत्कारापूर्वी सौ. शशिकला चौधरी व सौ. विनोदिनी शिखरे यांच्या हस्ते वाचनालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांनी सत्कारास उत्तर देतांना सुमारे एक तासभर आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

 प्रिन्स सुनील पाटील याच्या हस्ते डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांच्या पाच पुस्तकांची भेट ग्रंथालयाचे अध्यक्ष एस. बी. होरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. वाचनालयाचे सचिव बी. बी. गुरव व कवितासागर साहित्य अकादमीचे कार्यकारी संचालक डॉ. सुनील दादा पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन केले. आबासाहेब सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास अन्य ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी तसेच कवितासागर ग्रुप मधील अनेक कवी लेखक, तरुण साहित्यिक इत्यादी हजर होते. दत्तात्रय रामचंद्र हेरेकर हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.आभार हरी निवृत्ती जगताप यांनी मानले.