माणसाला माणूस म्हणून ओळख भारतीय संविधानामुळे- देवसुदन धारगावे

0
26

गोंदिया,दि.२७ : स्वातंत्र्यपूर्व काळात देश विविध राज्यात व संस्थानात विखुरलेला होता. राजा बोले प्रजा चाले अशी परिस्थिती होती. जाती-जाती आणि धर्माधर्मामध्ये विभाजन झाले होते. पारंपारीक पध्दतीने जातीवर आधारीत व्यवसाय चालायचे. स्वातंत्र्यानंतर डॉ.आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे वंचित, दुर्बल घटक आज विकासाच्या प्रवाहात येवू लागला आहे. पात्रता असलेली व्यक्ती देखील देशाच्या सर्वोच्च ठिकाणी बसू शकते ही संविधानामुळे शक्य झाले आहे. माणसाला माणूस म्हणून ओळख देण्याचे काम भारतीय संविधानामुळे झाले असल्याचे मत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे यांनी केले.
भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम २६ नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री.धारगावे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखेडे, समाज कल्याण अधिकारी श्री.पोवार यांची उपस्थिती होती.
धारगावे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देश एकसंघ चालावा यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली. २ वर्ष ११ महिने १७ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर भारतीय संविधान तयार झाले. भारतीय संविधानाचे महत्व अजरामर आहे. डॉ.आंबेडकरांनी जगातील अनेक राज्यघटनांचा अभ्यास केला. कोणावर अन्याय, अत्याचार होणार नाही त्याला न्याय मिळेल असे संविधान डॉ.आंबेडकरांनी तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले.
खडसे म्हणाले, भारतीय संविधान हा एक ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. भारतीय संविधानातील प्रत्येक कलम हे प्रत्येक भारतीयांना उज्ज्वल भविष्याकडे नेणारे दिपस्तंभ आहे. राज्यघटनेतील कलमे ही केवळ कायदयाची कलमे नाहीत तर त्यांच्यात शेकडो वर्षापासून खितपत पडलेल्या सुस्त भारतीय समाजाला खडबडून जागे करण्याची व समतेच्या उज्ज्वल भवितव्याकडे नेण्याची ताकद आहे. बालवयात मुलांनी संविधानाचे वाचन केले तर चांगले संस्कार मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रामटेके म्हणाले, या देशात बाबासाहेब जन्माला आले नसते आणि त्यांनी भारतीय संविधान लिहिले नसते तर देशाची स्थिती कशी असती याचा विचार न केलेला बरा. आज मागासवर्गीय समाजांनी डॉ.आंबेडकरांचे विचार आत्मसात केले पाहिजे. इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम ३४० वे कलम, अनुसूचित जमातीसाठी ३४१ वे कलम आणि अनुसूचित जातीसाठी ३४२ वे कलम लिहिले. या समाजासाठी तरतूद संविधानात केली नसती तर या समाजाची आज वाईट अवस्था असती. ज्या समाजांनी डॉ.आंबेडकरांचे विचार आजही आत्मसात केले नाही तो समाज आजही मागासच असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.सविता बेदरकर यांनी डॉ.आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल आचार्य कृपलानी डॉ.आंबेडकरांना काय म्हणाले होते आणि त्यावर डॉ.आंबेडकरांनी त्यांना काय उत्तर दिले हे यावेळी सांगितले. उपस्थितांना त्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची शपथ दिली.
प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी केले. संचालन प्रदीप ढवळे यांनी केले. उपस्थितांचे आभार समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरीक व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.