औरंगाबाद छावणी गॅस्ट्रो उद्रेक प्रकरणी हलगर्जी झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करु- मुख्यमंत्री

0
7

नागपूर, दि. 13 : औरंगाबाद छावणी परिसरातील जलवाहिनी जुनी असून या भागातील जलवाहिनीवरील गळतीच्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्यात आले आहेत. या परिसरात नोव्हेंबर महिन्यामध्ये उद्‌भवलेला गॅस्ट्रो उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रकरणी जाणिवपूर्वक हलगर्जी झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
या प्रश्नी सदस्य सर्वश्री सरदार तारासिंह, इम्तियाज जलील,दिलीप वळसे-पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, औरंगाबाद छावणी परिसरातील भूमीगत जलवाहिनी 40 वर्षे जुनी असून या भागात गळती आहे हे लक्षात आल्यानंतर तेथे नवीन पाईप टाकून 22 नोव्हेंबरपासून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात आला आहे.विविध विभागाच्या माध्यमातून या परिसरात उद्‌भवलेला गॅस्ट्रो उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी छावणी मंडळाकडून उपाययोजना करण्यात आली आहे.