अशोकरावांना दिलासा नाहीच

0
10

मुंबई – आदर्श गृहनिर्माण सोसायटी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींच्या यादीतून नाव वगळण्याची माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आरोपींच्या यादीत चव्हाण यांचे नाव कायम राहाणार आहे.
चव्हाण यांच्यावर कारवाईची परवानगी देण्यास तत्कालिन राज्यपालांनी नकार दिल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने चव्हाण यांचे नाव वगळण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. ती कोर्टाने नोव्हेंबरमध्ये फेटाळली होती. त्यावर अशोक चव्हाण यांनी पुन्हा याचिका दाखल केली होती. कोर्टाने आपला पूर्वीचाच निर्णय बुधवारी कायम ठेवला आहे. या प्रकरणावर मंगळवारी न्यायमूर्ती एम.एल. टहलियानी यांच्या पीठासमोर युक्तिवादा झाला होता. त्यानंतर त्यांनी या याचिकेवरील निर्णय बुधवारी देण्याचे स्पष्ट केले होते.
कटकारस्थान आणि फसवणुकीच्या आरोपाअंतर्गत कारवाई करण्यास राज्यपालांनी नकार दिला म्हणून चव्हाण यांनी महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून पदाचा दुरुपयोग केल्याच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, असे कोर्टाने याचिका फेटाळताना नमूद केले.