स्वच्छ भारता’चा संदेश पंतप्रधान ते विद्यार्थी व्हाया कीर्तनकार

0
14

वारकरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र शासनाचा संयुक्त उपक्रम
मुंबई (प्रतिनिधी),दि.08 : स्वच्छ भारताच्या निर्मितीचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले असून ते सत्यात उतरविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी ‘वाकरी साहित्य परिषदे’चे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. प्रधानांचा ‘स्वच्छ भारता’चा संदेश कीर्तनकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या प्रत्येक कुटुंबात रुजविण्याची मोहीम आखण्यात आली आहे. केवळ रस्त्यावर नव्हे तर प्रत्येकाच्या मनात स्वच्छतेचा विचार रुजविण्यासाठी मोहीम नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास ‘वारकरी साहित्य परिषदे’चे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानाचा स्वच्छतेचा संदेश वारकऱ्यांच्या माध्यमातून गावागावात पोहचविण्यासाठी वारकरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवार दि. 11 डिसेंबर रोजी मुंबई विधानवन येथे महाराष्ट्रातील एक हजार कीर्तनकारांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्याची माहिती देण्यासाठी विठ्ठल पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधानांचा स्वच्छतेचा संदेश गावागावात पोहचला तर त्यातून आरोग्याचे अनेक प्रश्न कमी होणार आहेत. सर्व साथीचे आजार हे अस्वच्छतेमुळेच होत असतात. त्याला आळा बसू शकेल. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या सहकार्याने आम्ही हे काम हाती घेतले आहे. त्यासाठी आमच्या संघटनेचे महाराष्ट्रातील एक हजार कीर्तनकार त्यात सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही कीर्तनाच्या माध्यमातून दिलेला एखादा संदेश हा आदरपूर्वक ऐकला जातो आणि त्याचे अनुकरण केले जाते. म्हणूनच आमच्या संस्थेचे कीर्तनकार हा संदेश घेऊन महाराष्ट्राच्या चाळीस हजार गावात जातील. गावात गेल्यानंतर त्या गावातील सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, स्थानिक वारकरी यांना सोबत घेऊन संपूर्ण गावात टाळमृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात येईल. त्यामुळे सर्वांच्या मनात सात्विक विचारांची पेरणी होईल. दिंडी नंतर कीर्तनकार स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे कीर्तन करतील. याच कीर्तनानंतर सर्व विद्यार्थ्यांना एक पत्रक देण्यात येणार आहे. त्यात युवा अवस्थेमध्येच सर्व महापुरुषांनी कशी क्रांती केली यांचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवलेला आहे. स्वच्छतेचे महत्त्व काय आहे. भारत स्वच्छ झाला तर रोगराईला कसा आळा बसू शकेल याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर सर्व उपस्थितांना स्वछतेबाबत शपथ देण्यात येईल. त्याच्या नंतर विद्यार्थ्यांकडून स्वछतेबाबत एक आश्वासनपत्र भरून घेतले जाईल. त्यात विद्यार्थी पंतप्रधानांना आश्वासन देतात की, आम्ही हा भारत स्वच्छ करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्नन पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. या आश्वासनांमुळे आपोआपच विद्यार्थ्यांच्या मनात स्वच्छतेची बिजे रुजतील. ते स्वत: तर स्वच्छतेचे नियम पाळतील, त्याचबरोबर आपल्या घरातील व्यक्तीला ते पाळण्यास भाग पाडतील, असा विश्वास विठ्ठल पाटील यांनी व्यक्त केला.
स्वछतेचा विचार महाराष्ट्रात घेऊन जाणाऱ्या कीर्तनकारांची परिषद मुंबई विधान भवन येथे मंगळवार, 11 डिसेंबर 2018 रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे, बापूसाहेब महाराज देहूकर, गहिणीनाथ महाराज औसेकर, निवृत्ती महाराज नामदास, माधव महाराज शिवणीकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, चैतन्य महाराज कबीर, दिनकर शास्त्री-भुकेले, एकनाथ महाराज हांडे, नरहरी बुवा चौथरी, शामसुंदर महाराज सोन्नर आदी उपस्थित राहणार आहेत.