लोकराज्य जुलैचा अंक प्रकाशित

0
13

मुंबई, दि. 12 : यंदाची 33 कोटी वृक्षलागवडीची तयारी व प्रेरणादायी यशकथांचा समावेश असलेल्या जुलैच्या लोकराज्य अंकाचे प्रकाशन वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते झाले. राज्यमंत्री श्री. फुके हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत.गेल्या पाच वर्षांत शासनाने अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. त्यांचा लाभ अनेक विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार यांनी घेऊन आपल्या जीवनात
बदल घडवून आणला. याबाबतच्या प्रातिनिधीक यशकथा या अंकात देण्यात आलेल्या आहेत.
राज्याच्या 50 कोटी वृक्षलागवडीच्या निर्धारातील अंतीम टप्प्यातील 33 कोटी वृक्षलागवडीची वन विभागाने जय्यत तयारी केली आहे. याचा आढावा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लेखात घेण्यात आला आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी जादा बसेसची सुविधा, आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘मिशन शौर्य’यावर आधारीत लेखांचाही यात समावेश करण्यात आला आहे.
राज्य विधीमंडळात सादर करण्यात आलेला 2019-20 या वर्षासाठीच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाबाबत  माहिती या अंकात देण्यात आली आहे. अंकाची किंमत 10 रुपये असून तो स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.
यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती व प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (वृत्त व जनसंपर्क) सुरेश वांदिले, संचालक (विशेष कार्य) शिवाजी मानकर, खासगी सचिव रविंद्र धुरजड, विभागीय संपर्क अधिकारी वर्षा फडके-आंधळे, सहायक संचालक मंगेश वरकड आदी उपस्थित होते.