आदिवासी विद्यार्थ्यांना विमा कवच देण्यासाठी प्रस्ताव करा- डॉ. परिणय फुके

0
10

मुंबई, दि. 12 : आदिवासी विद्यार्थ्यांना विमा कवच उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आदिवासी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारित आश्रमशाळा, वसतिगृह, नामांकित शाळा अशा विविध योजनांतर्गत राज्यातील एकुण 5.50 लाख आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आदिवासी विद्यार्थ्यांना विमा कवच उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने  डॉ. फुके यांनी सर्व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवून त्यांच्याशी आदिवासी विद्यार्थ्यांकरीता आरोग्य व जीवन विमा कवच
कशा पध्दतीने देता येईल याबाबत सखोल चर्चा केली.
सद्य परिस्थितीत आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनामार्फत दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान मदत म्हणून दिली जाते. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत वेळोवेळी विविध उपाययोजना करण्यात येतात. अपघाती कारणास्तव विद्यार्थ्यांचा मृत्यु ओढावतो अशा वेळी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य म्हणून विमा कवच असणे आवश्यक आहे. राज्य शासनामार्फत समाजातील इतर घटकांना विमा कवच उपलब्ध करुन देण्याबाबत विविध योजना उपलब्ध आहेत त्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्याना देखील विमा कवच आवश्यक असल्याचे मत डॉ. फुके यांनी व्यक्त केले.