स्वयंरोजगारासाठी आदिवासी युवकांना कौशल्य प्रशिक्षण- डॉ. परिणय फुके

0
13

मुंबई, दि. 22 : आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन उपजीविकेचे साधन स्वयंरोजगारातून मिळवून देणार असल्याची माहिती आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी दिली.वन क्षेत्रालगत राहणाऱ्या स्थानिक आदिवासींना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षण देणेबाबत बैठक मंत्रालयात झाली.या बैठकीस वन विभागाचे सह सचिव सुजय दोडल, आदिवासी विकास विभागाचे सह सचिव सुमित पाटील, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे प्रकल्प सहाय्यक डी.पी.केसरकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी डॉ. फुके म्हणाले, शिक्षणाच्या अल्प संधींमुळे मागे राहिलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन मदतीचा हात पुढे करून विविध कौशल्य विकासाचे दर्जेदार प्रशिक्षण देणार आहे. हे प्रशिक्षण विनामुल्य उपलब्ध करून दिले जाईल. यांतर्गत नवेगाव परिसरात अद्ययावत प्रशिक्षण सुविधांनी युक्त असलेले कौशल्य विकास केंद्र विविध अभ्यासक्रमांसह उपलब्ध होणार असून यासाठी दोन कोटी रुपये इतका निधी विभाग खर्च करणार असून हा निधी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे.

या केंद्रात हॉस्पिटॅलिटीड्राईव्हिंग ट्रेनिंग,हॉटेल मॅनेजमेंट, ऑटोमोबाइल यांसह कपड्यापासून बनविलेल्या कापडी पिशव्या, कागदी पिशव्या, कागदापासून पेन्सिल, पेन बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. या उत्पादनांच्या विक्रीसाठी बिग बाजारडी-मार्ट यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये स्वतःचे स्टॉल उभारले जातील. याची सुरुवात नागपूरमधून होणार आहे. राज्यामधून अनेक औद्योगिक आस्थापना व खासगी कंपन्या या प्रकल्पास हातभार लावतील. यातून कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होऊन आदिवासी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

या बैठकी दरम्यान प्रथम शैक्षणिक संस्थेने पेंच येथे दोन महिन्यांच्या हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षणातून तीन वर्षात एक हजार मुलांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे सांगितले. ही संस्था या व्यतिरिक्त विविध विषयांचे प्रशिक्षण देतेप्रशिक्षणाचा कालावधी दोन महिन्याचा असून याचा उद्देश आदिवासी समाजाला उद्योग प्रशिक्षण देऊन यशस्वीरित्या रोजगाराभिमुख बनविणे आहे. या विशेष प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांची निवास व्यवस्थाभोजन व्यवस्था व प्रवास खर्च यासाठीचा खर्च संस्थेमार्फत होत असल्याची माहिती प्रथमच्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.आदिवासी समाजातील युवक-युवतींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने कौशल्यपूर्ण शिक्षण एक महत्त्वाचे पाऊल आहे. येत्या काळात विविध कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ.फुके यांनी सांगितले.