नैसर्गिक आपत्तीत 33 टक्‍के नुकसानीचीही भरपाई

0
28

मुंबई दि. 6: – नैसर्गिक आपत्तीत भरडणाऱ्या शेतकऱ्यांना जाचक पैसेवारीच्या अटीत सरकारने आज दिलासा दिला. केंद्राच्या धर्तीवर 50 टक्‍के नुकसानीची अट शिथिल करत 33 टक्‍के नुकसान झाले, तरी भरपाई देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्‍कामोर्तब केले.
केंद्र सरकारच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांना 2015 ते 2020 या कालावधीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकष व दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीत 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांना दुष्काळग्रस्त घोषित करून तातडीच्या उपाययोजनांचा लाभ देण्यात येत होता. मात्र केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार पीकनुकसानीची 50 टक्‍क्‍यांची अट 33 टक्के इतकी शिथिल करण्यात आली आहे. तसेच कोरडवाहू शेतीसाठी 4500 रुपयांवरून 6800 रुपये, तर बागायती क्षेत्रासाठी नऊ हजार रुपयांवरून 13 हजार 500 रुपये आणि फळबागांसाठी (बहुवार्षिक पिके) 12 हजार रुपयांवरून 18 हजार रुपयांची मदत किमान दोन हेक्‍टरसाठी देण्यात येणार आहे. राज्य सरकारने केंद्रच्या या धर्तीवरच राज्याचेही निकष कायम राहतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
केंद्र सरकारने ठरविलेले निकष व दर जसेच्या तसे राज्यात लागू करण्यात येणार आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, हिमखंड कोसळणे, टोळधाड, दुष्काळ, ढगफुटी व कडाक्‍याची थंडी या आपत्तींचा समावेश केंद्राने केला आहे. या आपत्तींकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत करण्यात येते. तसेच राज्य शासनातर्फे अवेळी पाऊस, अतिवृष्टी (शेतीपिकांच्या नुकसानीसह सर्व नुकसान), आकस्मिक आग, समुद्राचे उधाण, वीज कोसळणे या नैसर्गिक आपत्तींमध्येही राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या मानक व दरानुसार मदत करण्यात येते.
अशी असणार भरपाई…
– कोरडवाहू शेतीसाठी – 4500 वरून 6800 रुपये
– बागायती क्षेत्रासाठी – नऊ हजारांवरून 13,500 रुपये
– फळबागांसाठी (बहुवार्षिक पिके) – 12 हजारांवरून 18 हजार रुपये
– मदत किमान दोन हेक्‍टरसाठी देण्यात येणार
नैसर्गिक आपत्ती
चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, हिमखंड कोसळणे, टोळधाड, दुष्काळ, ढगफुटी व कडाक्‍याची थंडी

आंबा-काजू बागा कसणाऱ्यांनाच मदत
कोकणात आंबा आणि काजूच्या बागा कसणारे अनेक शेतकरी या बागांचे मूळ मालक नसल्याने नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांचेच आर्थिक नुकसान होते. त्यामुळे, नैसर्गिक आपत्तीतल्या नुकसानभरपाईची मदत थेट बागा कसणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात यावी, असा मानस राज्य सरकारने व्यक्‍त केला असून, याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळात येण्याची शक्‍यता असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयातील दालनात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.