30.2 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home महाराष्ट्र ‘कॉमा’ माहितीपटाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विमोचन

‘कॉमा’ माहितीपटाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विमोचन

0
44

कॅन्सरविषयी जनजागृती आवश्यक

 मुंबई, दि. 29 : कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे निदान वेळीच होणे गरजेचे असल्याने कर्करोगाविषयी जनजागृती होणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.कर्करोगावर मात केलेल्या श्रीमती अलका भुजबळ यांच्या जीवनावर आधारित कॉमा माहितीपटाचे प्रकाशन राजभवन येथे  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ, रिलायन्स हॉस्प‍िटलचे डॉ.गुस्ताद डावर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रेखा डावर, कर्करोगावर मात केलेल्या कॉमा पुस्तकाच्या लेखिका श्रीमती अलका भुजबळ, कॉमा माहितीपटाचे निर्देशक आशिष निनगुरकर उपस्थित होते.राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, कर्करोगाविषयी जनजागृती होणे अतिशय आवश्यक असून यावर त्वरीत उपाययोजना झाल्यास काही बाबतीत नियंत्रण ठेवता येवू शकते. स्वत: कर्करोगावर यशस्वी मात केलेल्या लेखिका श्रीमती अलका भुजबळ यांचे अभिनंदन करताना त्यांच्या ‘कॉमा’ या पुस्तकातून तसेच माहितीपटातून लोक प्रेरणा घेतील, असा विश्वास राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी व्यक्त केला.

कॉमा पुस्तकाच्या प्रतीची भेट दिली असताना श्री.कोश्यारी म्हणाले, या पुस्तकामध्ये स्वत:च्या संघर्षाची कहाणी मांडण्यात आली आहे, या पुस्तकाचे हिंदी व इंग्रजीमध्ये अनुवाद होणे आवश्यक आहे. श्रीमती अलका भुजबळ म्हणाल्या, कर्करोगावर मात करत असताना मला कुटुंबाचा खुप मोठा आधार मिळाला. तसेच माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी मला प्रोत्साहन देऊन मोलाचे सहकार्य केले. आपण ज्या डॉक्टरांकडून उपचार घेतो, त्या डॉक्टरांवर विश्वास ठेवणे  महत्वाचे असते. कर्करोगाला घाबरु नका तर त्यावर मात करा, असे आवाहनही श्रीमती भुजबळ यांनी यावेळी केले.स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.रेखा डावर म्हणाल्या, स्त्रीयांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. ही चिंते बाब आहे. चाळीशीनंतर सर्व स्त्रियांनी दरवर्षी ठराविक तपासण्या करुन घेण्याचे महत्व त्यांनी विशद केले.

माहितीपट पाहिल्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे म्हणाले, श्रीमती अलका भुजबळ यांनी कर्करोगावर जी मात केली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. कर्करोगाला न घाबरता त्यावर मात करणाऱ्या श्रीमती भुजबळ स्वत: एक आदर्श आहेत. त्यांनी या माहितीपटामध्ये स्वत:च्या संघर्षाची कहाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा लढा कर्करोगग्रस्तांसाठी नव्हे तर जनतेसाठी देखील प्रेरणादायी आहे, असा विश्वास श्री.पांढरपट्टे यांनी व्यक्त केला.समाजात कर्करोगाबद्दल जी भिती आहे त्याबद्दलचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. कर्करोगावर सुद्धा मात करता येऊ शकते असे त्याचे उदाहरण स्वत: श्रीमती भुजबळ आपल्यासमोर आहेत. कर्करोगाशी सामना कशाप्रकारे केला जातो हे ह्या माहितीपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येत असल्याचेही श्री.पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन श्री.देवेंद्र भुजबळ यांनी केले तर आभार श्रीमती अलका भुजबळ यांनी मानले. प्रारंभी डॉ.गुस्ताद डावर यांनी राज्यपालांना शाल, पुष्पगुच्छ देऊन तर डॉ.रेखा डावर यांनी स्मृतीचिन्ह देऊन गौरविले.