32.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home महाराष्ट्र अविष्कार संशोधन स्पर्धेवर मुंबई विद्यापीठाचे वर्चस्व,सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाचा बहुमान

अविष्कार संशोधन स्पर्धेवर मुंबई विद्यापीठाचे वर्चस्व,सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाचा बहुमान

0
23

मुंबई,३१ जाने. – २८ ते ३१ जानेवारी, २०२० दरम्यान मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या आंतरविद्यापीठ अविष्कार संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने नेत्रदिपक कामगिरी करत ९३ गुणांसह अंतिम विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे. मुंबई विद्यापीठाने १५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदकांची कमाई करत अविष्कार संशोधन स्पर्धेवर सलग तिसऱ्या वर्षी विजयी मोहोर उमटली आहे. यामध्ये मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी,           मुलभूत शास्त्रे, शेती व पशू संवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या वर्गवारीतून एकूण १५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदके पटकावले आहेत. विद्यापीठाच्या वतीने या स्पर्धेमध्ये एकूण ४८ संशोधक सहभागी झाले होते. सहा वर्गवारीतून आणि चार गटातून एकूण ५७३ प्रकल्प सादर करण्यात आले. यामध्ये पोस्टर किंवा मॉडेल सादरीकरण आणि मौखिक सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या नवकल्पकतेतून साकारलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. पद्म विभूषण प्रा. एम.एम. शर्मा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, राजभवन समितीचे प्रा. संजय चाकणे आणि प्रशांत गावंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना, प्रा. एम.एम. शर्मा म्हणाले की,  विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जे काही संशोधन झाले आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. दैनदिन जीवनात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक संशोधक पुढे सरसावले आहेत. पोलीओ, टीबी यासारख्या आजांरावरील लस, एलईडी, बॉलपेन, नॉयलॉन, पॉलिमर यासह अनेक क्षेत्रातील संशोधनाची उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच इन्वेन्शन आणि इनोव्हेशन याची सांगड कशी घालावी हेही उदाहरणासह स्पष्ट करुन सांगितले. तसेच अपयशातूनच यशाचा मार्ग मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी काही ठराविक प्रकल्पांना विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरच्या मदतीने स्टार्ट-अपसाठी सहाय्य करता येऊ शकेल काय याची चाचपणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या चार दिवसीय संशोधन स्पर्धेच्या नियोजनातील सर्वात मुख्य बाब म्हणजे नियोजन समितीने विशेष सॉफ्टवेअर तयार केले होते. तसेच पहिल्यांदाच विद्यार्थ्यांसह मार्गदर्शकांना सन्मानपत्र आणि त्या-त्या विद्यापीठांचाही गौरव करण्यात येणार असल्याचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी सांगितले.

संशोधनाद्वारे समाजजीवन सुसह्य व आनंददायी करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मा. राज्यपाल श्री एस.एम.कृष्णा यांच्या कल्पकतेतून अविष्कार आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील नवकल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन ओळखून त्यांना संधी उपलब्ध करुन देणे, उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी संधीची उपलब्धता करुन देणे, संशोधनवृत्तीला बळ देऊन राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अधिकाधिक सहभागिता वाढविणे, लघु आणि दीर्घ संशोधन प्रकल्पातून संशोधन विकासाला हातभार लावण्यासाठी शिक्षकांचा सहभाग वाढविणे त्याचबरोबर निवडक विद्यार्थ्यांना फेलोशिप/ स्कॉलरशिपच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे अशा वैविध्यपूर्ण हेतूने या स्पर्धेची सुरूवात २००६-०७ पासून करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे १४ वर्ष असून राज्यातील सर्व २० विद्यापीठे या स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेच्या आयोजनाचा बहुमान पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठाला मिळाला होता.

“संशोधनाच्या क्षेत्रात मुंबई विद्यापीठाने केलेल्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे आज राज्य स्तरावर मुंबई विद्यापीठाचा नावलौकीक होतो आहे, याचा विशेष आनंद होत असून विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संशोधन, नाविण्यता आणि कल्पकतेच्या जोरावर अविष्कार सारख्या संशोधन स्पर्धेतील यशाने मुंबई विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. संशोधनातून समाजजीवन कसे सुसह्य होऊ शकेल यासाठी अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील संशोधन वृत्तीला चालना द्यावी, मला या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे शास्त्रज्ञ पाहायला मिळत आहेत. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा ” – प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ)