रेशन दुकानाचा वारसा हक्क विवाहित मुलींसह सावत्र मुलांनाही

0
48

मुंबई, दि. १२-केरोसीन आणि रेशन दुकानासाठी परवानाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना दुकान देताना वारसदारांमध्ये विवाहित मुलींसह घटस्फोटीत पती – पत्नी, सावत्र मुलगा – मुलगी, दत्तक मुलगा – मुलगी, दत्तक आई – वडील, सावत्र भाऊ – बहिणी तसेच विधवा सून यांचाही समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कुटुंबाच्या व्याख्येबाबतचा शासनादेश गुरुवारी जारी केला. यापूर्वी रेशन दुकानासाठीच्या परवानाधारकाचे वारस ठरविण्यासाठी तसेच केरोसीन दुकानांसाठीचे वारस ठरविण्यासाठी असे दोन वेगळे शासनादेश होते. दोन्ही शासनादेशामध्ये वेगवेगळया वारसांना वारसा हक्क नमुद केला असल्याने दुकान हस्तांतरीत होत असताना भेदभाव होत होता. नव्या सर्व समावेशक आदेशानुसार या दोन्ही बाबतीत एकसमानता आणण्यात आली आहे.

यापूर्वीच्या निर्णयान्वये राज्यातील अधिकृत शिधावाटप /रास्त भाव दुकानदार यांच्या मृत्यूनंतर वारसाच्या व्याख्येत पती किंवा पत्नी तसेच सज्ञान मुलगा , सज्ञान अविवाहीत मुलगी, अवलंबीत आई किंवा वडील यांचाच समावेश करण्यात आला आहे.

किरकोळ केरोसीन परवाना धारक / हॉकर्स / अर्धघाऊक परवानाधारक यांच्या मृत्यूनंतर परवाना धारकांच्या वारसांच्या नावे परवाना वर्ग करताना कुटुंबाच्या व्याखेत परवाना धारकांचे पत्नी अथवा पती, सज्ञान मुलगा, सज्ञान मुलगी, सज्ञान अविवाहित मुलगी, परवाना धारकांवर अवलंबून असणारे आई-वडील, सून, दत्तक पुत्र व परवाना धारकांवर अवलंबून असणारी घटस्फोटीत मूलगी यांचा समावेश करण्यात आला होता.

उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशामध्ये किरकोळ केरोसीन परवाना व रास्त भाव दुकान परवाना वारसाने वर्ग करताना कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश केला आहे.

सुधारीत शासन निर्णयामध्ये परवाना धारकांच्या मृत्यू नंतर परवाना वारसाच्या नावे वर्ग करताना कुटुंबाची व्याख्या खालील प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

(१) पुरुष परवानाधारकाच्या बाबतीत एक व अनेक पत्नी, यामध्ये न्यायीक फारकत घेतलेल्या पत्नीचाही समावेश केला आहे.

(२) महिला परवानाधारकाच्या बाबतीत पती, यामध्ये न्यायीक फारकत घेतलेल्या पतीचाही समावेश केला आहे.

(३) अवलंबीत आई – वडील

(४) सज्ञान मुलगे, यात सावत्र सज्ञान मुलगे आणि दत्तक सज्ञान मुलगे.

(५) अविवाहित सज्ञान मुली, यात सावत्र सज्ञान मुली आणि दत्तक सज्ञान मुली.

(६) घटस्फोटीत मुली

(७) विधवा मुली यात सावत्र मुली आणि दत्तक मुली

(८) वडील – ज्यांना व्यक्तीगत कायद्यानुसार दत्तक विधानास परवानगी असेल अशा व्यक्तीच्या बाबतीत, दत्तक आई / वडील

(९) आई – ज्यांना व्यक्तीगत कायद्यानुसार दत्तक विधानास परवानगी असेल अशा व्यक्तीच्या बाबतीत, दत्तक आई / वडील

(१०) सुन / विधवा सुन

(११) भाऊ / सावत्र भाऊ

(१२) सज्ञान अविवाहित बहीणी आणि विधवा बहिणी, यात सज्ञान सावत्र बहिणाचाही समावेश केला आहे.

(१३) विवाहित मुली

(१४) पुर्वी मृत्यू पावलेल्या मुलांची / मुलींची सज्ञान अपत्ये