अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर

0
67

मुंबई, दि. 18 :- अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे सोमवार दि.19 ऑक्टोबरपासून तीन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात राज्यमंत्री श्री.सत्तार हे सोमवारी सकाळी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देतील. त्यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील  पांढरवाडी ,पाडळसिंगी  व पाचेगाव येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी बीड जिल्ह्यातील कुर्ला, शिवनी व पाली या भागांचा दौरा करणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतील. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आणि महाराजस्व अभियान याबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

मंगळवार दि. 20 ऑक्टोबर 2020 रोजी महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार हे उस्मानाबाद जिल्ह्यातील सिलवडी व सुरडी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे त्यांचे आगमन होणार असून तेथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ व महाराजस्व अभियानाचाही आढावा ते यावेळी घेणार आहेत. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

बुधवार दि. 21 ऑक्टोबर रोजी श्री. सत्तार हे लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा व लातूर तालुक्‍यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.    दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा ते घेणार आहेत. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ व महा राजस्व अभियान याबाबतही आढावा घेणार आहेत.