अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने 48 तासात पूर्ण करावेत – पालकमंत्री अमित देशमुख

0
54

लातूर, दि. 19 : जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने 48 तासात पूर्ण करावे.  शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री श्री. देशमुख बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देशमुख म्हणाले, कालच निलंगा व औसा तालुक्याच्या काही गावात अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाची पाहणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन केली. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांची पडझड, जनावरांची जीवितहानी आणि रस्ते व पुलांचे झालेले नुकसान याचे प्रशासनाने त्याचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. शेती पिकाचे पंचनामे पुढील 48 तासात पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

अतिवृष्टीने, पुरामुळे शेतजमिनीचेही नुकसान झालेले आहे. माती वाहून गेल्याने काही ठिकाणी जमिनी पेरणीयोग्य नाहीत. अशा शेतकऱ्यांनाही शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील जिल्ह्यातील सर्वच सिंचन प्रकल्पांमध्ये समाधानकारक साठा असून सद्यस्थितीत मांजरा धरणात 90 टक्के तर निम्न तेरणा प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

सोनखेड व शिवणी भागात जी परिस्थिती उद्भवली तसेच बॅरेजमधील पाणी वाहून जाऊन शेतकऱ्यांच्या शेतीचेही नुकसान झाले त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आलेले असून चौकशीनंतर जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.