धरण क्षेत्रात दूषित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करा – मंत्री गुलाबराव पाटील

0
68

मुंबई, दि. 4 : चिखलोली धरण क्षेत्रालगत असलेल्या रासायनिक कारखान्यातून दूषित पाणी धरण क्षेत्रात सोडण्यात येत आहे. धरणाचे पाणी दूषित होऊन शहराला दूषित पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभाग यांनी धरण क्षेत्रात दूषित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

अंबरनाथ शहरातील वाढत्या दूषित पाणी प्रश्नासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयातील परिषद सभागृहात घेण्यात आली. यावेळी आमदार बालाजी किणीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणेचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सुधाकर वाघ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एस के दशोरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव राजेंद्र गैगने, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अंबरनाथ शहरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे, अंबरनाथ शहराची लोकसंख्या लक्षात घेता पाण्याच्या मागणीपेक्षा पाणीपुरवठा जास्त आहे. तरीही शहरात पाणीटंचाई जाणवत आहे. पाणी गळती असल्यामुळे तसेच मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ जोडण्यांमुळे अनियमित पाणीपुरवठा होत असल्याबाबत बैठकीत चर्चा झाली. संबंधि‍त अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या, अशा सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.