धुळे, दि. 11- : धुळे जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली आहे. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदनशील राहत ‘उभारी’ या कार्यक्रमांतर्गत उत्पन्नाचे शाश्वत स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.
आयुक्त श्री. गमे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विश्व मानव रुहानी केंद्राच्या माध्यमातून ‘उभारी’ या कार्यक्रमांतर्गत शिलाई मशीन व फवारणी पंपांचे वितरण करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, उपवनसंरक्षक माणिक भोसले, उपायुक्त अर्जुन चिखले (रोहयो), अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
आयुक्त श्री.गमे म्हणाले, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते. या भावनेतूनच ‘उभारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अशा कुटुंबांच्या पाठिशी प्रशासन आहे ही भावना रुजवायची आहे. या कुटुंबांना कृषी, ग्रामीण विकासासह विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. या महिलांना बचत गटाचे सदस्यत्व करून घ्यावे.
उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारावे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कुटुंबांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात. त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. ते आगामी काळातही त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करतील. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
विश्व मानव रुहानी केंद्राच्या माध्यमातून विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांचा एक भाग म्हणून 36 शिलाई मशीन आणि 26 फवारणी पंपांचे वितरण करण्यात येणार आहे, असे केंद्राचे सेवेकरी राजेंद्र आहुजा यांनी सांगितले. यावेळी केंद्राचे सेवेकरी उमेश चौधरी, सुमीत आहुजा आदी उपस्थित होते.
या कुटुंबांना मिळाला आधार : धुळे तालुका : सीमा भरत पाटील (निमडाळे), उमेश लक्ष्मण पाटील (बुरझड), राजेंद्र महादू बागूल (कुंडाणे). धुळे शहर : सुषमा राजेंद्र पाटील (फागणे), मनीषा राजेंद्र महाले (रावेर), उज्ज्वला कैलास पाटील (नगाव), विजया माधवराव सूर्यवंशी(फागणे), मनोहर आबा पाटील (गोंदूर), शोभाबाई नागराज पाटील (कुंडाणे), राहुल अरुण पाटील (बाळापूर).