ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी घेतला आढावा

0
56

वाशिम, दि. ११ : जिल्ह्यातील ७ ग्रामपंचायत अंतर्गत १० गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज आढावा घेतला. तसेच या गावांमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी जनजागृती करण्याबाबत ग्राम परिवर्तक व कृषि सहाय्यक यांनी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या जिल्हा अभियान समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, कालिदास तापी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा कृषि विकास अधिकारी विकास बंडगर, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक उत्तम फड यांच्यासह संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अभियानाचे जिल्हा समन्वयक वासुदेव ढोणे यांनी अभियानाच्या अनुषंगाने माहितीचे सादरीकरण केले.

कारंजा लाड तालुक्यातील वढवी, वाई, किनखेड, लोहारा, शेवती, मालेगाव तालुक्यातील कवरदरी व वाडीरामराव ग्रामपंचायत क्षेत्रात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. या सर्व गावांमधील शेतकऱ्यांमध्ये कृषि विभाग, आत्मा व ग्राम परिवर्तक यांनी संयुक्तपणे जनजागृती करून गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती द्यावी. तसेच प्रत्येक गावामध्ये किमान एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे नियोजन करावे. ‘पोकरा’ अंतर्गत पात्र सर्व शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी दिल्या.