रेल्वेत स्लीपर कोचऐवजी चेअर कार?

0
17

नवी दिल्ली-रेल्वे प्रवाशांच्या संख्येत होत असलेल्या वाढीच्या तुलनेत रेल्वेगाड्यांच्या संख्येत वेगाने वाढ होत नसल्यामुळे अनेकदा तिकीट खरेदी करण्यास प्रवासी तयार असले तरी रेल्वेकडेच जागा उपलब्ध नसते. ही परिस्थिती बदलण्यासाठीच रेल्वेने दहा तासांपेक्षा कमी तासांत प्रवास पूर्ण करणा-या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांतील सेकंड क्लासच्या डब्यांमधून स्लीपर कोच हटवून फक्त चेअरकारची व्यवस्था करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला आहे.
स्लीपर कोचची व्यवस्था असलेल्या सेकंड क्लासच्या प्रत्येक डब्यात जास्तीत जास्त ७२ प्रवाशांचीच व्यवस्था असते. पण स्लीपर कोच काढून चेअरकारची व्यवस्था केल्यास प्रत्येक डब्यात १०० पेक्षा जास्त प्रवासी बसू शकतील, त्यामुळे रेल्वे चेअरकारच्या व्यवस्थेवर विचार करत आहे. या संदर्भात मंत्रालयाने रेल्वेच्या सर्व विभागांकडून मते मागवली आहेत.
दरम्यान, रेल्वे प्रशासानाने चेअरकारच्या प्रस्तावातील काही तांत्रिक अडचणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यापुढे मांडल्याचे समजते.अशा परिस्थितीत दहा तासांपेक्षा कमी तासांत प्रवास पूर्ण करणा-या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांतील सेकंड क्लासच्या डब्यांसाठी चेअरकारची व्यवस्था करणे अवघड असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रवासी दिवसा चेअरकारमधून प्रवास करण्यास तयार असले तरी रात्री अशा पद्धतीने प्रवास करण्यास तयार होतील का?, असा एक प्रश्नही प्रशासनाकडून उपस्थित करण्यात आला आहे.