दहशतवादग्रस्त देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

लंडन, दि. १९ – जगभरातील दहशतवादग्रस्त देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक लागला असून भारतात २०१३ मध्ये दहशतवादी हल्ल्याच्या ६२४ घटना घडल्या असून यामध्ये ४०४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरातील दहशतवादी हल्ल्यांमध्येही २०१२ च्या तुलनेत तब्बल ४४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे ग्लोबल टेररिझम इंडेक्स या अहवालात म्हटले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेने नुकतेच लंडनमध्ये ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०१४ या अहवालाचे लंडनमध्ये प्रकाशन केले आहे. या अहवालात जगभरातील १६२ देशांचा समावेश करण्यात आला आहे. दहशतवादी घटना, त्यामध्ये होणारी जीवितहानी व वित्तहानी या आधारे हा अहवाल तयार केला आहे. आयएसआयएस या दहशतवादी संघटनेमुळे धुमसणारा इराक हा दहशतवादग्रस्त देशाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल अफगाणिस्तान आणि पाकिस्तान अनुक्रमे दुस-या व तिस-या स्थानावर आहे. तर नायजेरिया चौथ्या आणि सिरीया पाचव्या क्रमांकावर आहे. या देशांच्या खालोखाल भारताचा सहावा क्रमांक लागला आहे. गेल्या वर्षी भारत पाचव्या क्रमांकावर होता. यंदा भारत एका क्रमांकाने खाली असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहशतवादी हल्ले आणि त्यामध्ये मृत्यूमुखी पडणा-यांचे प्रमाण वाढल्याचे अहवालावरुन स्पष्ट होते. गेल्या वर्षी भारतात दहशतवादी हल्ल्याच्या ५६९ घटना घडल्या होत्या. यामध्ये २३८ जणांचा मृत्यू झाला होता.