वैजनाथ महाराज की जय च्या जयघोषाने परळी नगरी दुमदुमली

0
11

परळी-कोविड -19 चा प्रादुर्भाव जवळपास संपुष्टात आल्यानंतर प्रथमच महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभु वैद्यनाथ मंदिर  भाविकांच्या विक्रमी गर्दीने फुलून गेले होते. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथे यावर्षीचा महाशिवरात्री उत्सव भक्तीपूर्ण व उल्हासपुर्ण वातावरणात होत असल्याचे दिसून येत आहे.कोविड-19 च्या सलग दोन वर्षानंतर बंद असलेली मंदिरे आज प्रथमच खर्‍या अर्थाने भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. दरम्यान महाशिवरात्रीला होणाारी संभाव्य गर्दी लक्षात घेता वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून मंदिराच्या पायर्‍यांवर भव्य मंडप व लोखंंडी बॅरीकेटस लावण्यात आली आहेत. मंदिर परिसरात पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
*आज सायंकाळी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शासकीय महापुजा*
महाशिवरात्र यात्रेनिमित्त श्री वैद्यनाथ मंदिरात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता श्री वैद्यनाथ प्रभूंची शासकीय महापुजा होणार आहे. यावेळी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथास रूद्राभिषेक करण्यात येणार आहे.
*श्रीं ची पालखी*
महाशिवरात्र यात्रेनिमित्त श्री वैद्यनाथ प्रभूंची पालखी दि.3 मार्च रोजी शहरातील जुन्या गावभागातील नांदुरेवस गल्ली, गोपनपाळे गल्ली, देशमुखपार या भागातून सायंकाळी 5 वा. निघणार आहे. तसेच सायंकाळी देशमुखपार येथे मंजिरी आलेगावकर यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार असल्याचे वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.
*यात्रा रद्द झाल्याने छोट्या व्यावसायिकांचे हाल*
कोविड-19 च्या महामारीमुळे दोन वर्ष मंदिरे बंद होती. महाशिवरात्रीमध्ये दोन वर्ष यात्रा भरली नाही. दरम्यान कोविड-19 चा जवळपास नायनाट झाला असल्याने यावर्षी यात्रा मोठया उत्साहात भरेल अशी अपेक्षा होती. मात्र यावर्षीही प्रशासनाच्या आदेशाने यात्रा रद्द झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्‍या व्यावसायिकांचे प्रचंड हाल झाले असल्याचे दिसून आले. या शिवरात्रीत तरी दुकाने लावता येतील अशी व्यावसायिकांची अपेक्षा होती मात्र छोटया व्यावसायिकांचा हिरमोड झाला आहे.