‘बुलेट ट्रेन’ची गरज दहा वर्षांनंतर

0
17

नागपूर : बदलत्या तंत्रज्ञानानुसार आठ ते दहा वर्षांत देशात ‘बुलेट ट्रेन’ची गरज भासणार आहे. या ट्रेनचे तंत्रज्ञान नेहमीच्या गाड्यांमध्येही वापरता येऊ शकते, असे मत मेट्रोमॅन डॉ. ई. श्रीधरन यांनी येथे व्यक्त केले. 
नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमानंतर श्रीधरन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच नव्हे तर इतर गाड्यांची आणि ट्रॅकची संख्या वाढविली पाहिजे. 
एका प्रश्नाच्या उत्तरात श्रीधरन म्हणाले, देशात स्थापन होणार्‍या मेट्रो रेल्वे प्रकल्पांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारचा चांगला ताळमेळ दिसून येतो. त्यामुळे बांधकाम करताना अडथळा फार कमी येतो आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होतो. मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण करताना गुंतवणूक आणि बांधकाम खर्च कमी असावा, यावर त्यांनी भर दिला. प्रकल्प पूर्ण करताना शासनावर अवलंबून राहू नये. ६0 टक्के कर्जाची गरज भासते. कोकण रेल्वेच्या स्थापनेवेळी शासनाने ट्रॅक्स फ्री बॉण्ड काढला होता. 
जनरल कन्सलटंट नियुक्ती झाली नाही, पण त्यामुळे नागपूर मेट्रो रेल्वेचे कोणतेही काम थांबले नाही. सिव्हिल आणि तांत्रिक कामे जनरल कन्सलटंट करतो. ही कामे या प्रकल्पात पूर्वीपासूनच सुरू असल्याचे श्रीधरन यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.