नंदुरबार येथे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू

0
8

नंदुरबार,दि.2: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील 317 तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे 30 चाचण्या मोफत करण्यात येतील.

‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचा काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत डिजीटल अनावरण करण्यात आले.

यावेळी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी नंदुरबार येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे.आर.तडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.जयेश सुर्यवंशी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वळवी आदी उपस्थित होते.

आपला दवाखाना केंद्रातून बाह्य रुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रेसाठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण आदी सेवा नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तसेच गरजेनुसार सात प्रकारच्या तज्ञ सेवा देणार आहे त्यात फिजीशियन, स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान,नाक,घसा तज्ञांचा समावेश राहील.