जल जीवन मिशन योजनेच्या लाभापासून एकही व्यक्ती वंचित राहणार नाही – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

0
13

नंदुरबार,दि.2 मे : प्रत्येक गावांत जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवितांना एकही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

नंदुरबार तालुक्यातील नळवे खु. व पाचोराबारी येथील जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित,  सरपंच श्रीमती. सरुबाई नाईक (नळवे खुर्दे) , उपसरपंच  प्रेमचंद बंजारा, पाचोराबारी येथील सरपंच व उपसरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते  श्रावण चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, जलजीवन मिशन योजनेत प्रत्येकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करुन पुढील 30 वर्षांचे नियेाजन केले आहे. ही योजना 2024 पर्यंत पूर्ण करावयाची असल्यामुळे प्रत्येक गावातील एकही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता  घ्यावी. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने नियमित ग्रामसभा घ्याव्यात.  प्रत्येक व्यक्तींला 55 लिटर दरडोई पाणी मिळणार असल्याने पाण्याचा वापर अधिक होईल व त्यातून सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने येत्या काळात भूमिगत गटाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून येत्या दोन वर्षांत प्रत्येक वाडा, वस्ती व पाड्यांत जाण्यासाठी बारमाही रस्ते तयार करण्यात करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ज्या व्यक्तींना स्वत:चे घर नाही तसेच ज्या व्यक्तींचे ‘ड’ यादीत नाव सर्व समाजातील लोकांसाठी घरकुल योजनेतून घरे देण्यात येणार आहे. महिला बचत गटाचे सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटाना विविध योजनेच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. आदिवासी समाजातील नागरिकांना गाई, म्हशी, बकरी देण्यात येते त्याच पद्धतीने इतर समाजातील लोकांनाही त्या देण्यासाठी आमचा शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गाई व म्हशीसाठी शेड उपलब्ध करुन देण्यात येईल. येत्या काळात आदिवासी विकास विभागातून खावटी देण्यात येईल. पाचोराबारी येथील शेतकऱ्यांना विरचक धरणाचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी पाटचारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित म्हणाल्या की, या गावासाठी एमआरईजीएसच्या माध्यमातून गटारी, क्रॉकीट रस्ते, पेवर ब्लॉकचे कामे मंजूर झाले असून ते लवकरच सुरु करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळया योजनाच्या माध्यमातून शाळा,अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्राची दूरुस्ती करण्यात येईल. तांडावस्ती योजनेंतर्गत क्रॉकींट रस्ता मंजूर झाला असून लवकरच त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलजीवन मिशनमुळे प्रत्येक कुटूंबाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार असल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी सुटणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खासदार डॉ.गावीत म्हणाल्या की, आपल्या नळवे खुर्दे गावात दुसऱ्यांदा भूमीपूजन करण्याची संधी मिळाली आहे. यापुर्वी समाज मंदीराचे भूमीपूजन आपल्या गावात संपन्न झाले. आज आपल्या गावात येथील नागरिकांसाठी  जल जीवन मिशनच्या योजनेचे भूमीपूजनासाठी मी आले आहे. मला आपणास कळविण्यास अंत्यत आनंद होत आहे की, या गावासाठी 150 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मी केंद्र शासनाकडून मंजूर करुन घेतली आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी एखाद्या गावासाठी इतका निधी सहसा मिळत नसतो. यापुर्वी केंद्र व राज्याची नळपाणीपुरवठा योजना राबविण्यात येत होती. परंतू योजना राबवितांना काही ठिकाणे या योजनेतून राहून जात होती तर काही ठिकाणी या योजनेची द्विरुक्ती होत असे त्यामुळे  देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीनी ठरवले की या दोन वेगवेगळया योजनाचे एकत्रित करुन जलजीवन मिशन योजना सुरु केली. यासाठी मी नंदुरबार व धुळे लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गाव, पाड्यात ही योजना राबविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली  त्यानुसार  ती मान्य करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी जल जीवन मिशनअंतर्गत नळवे खु. गावातील 3 हजार 628 लोकसंख्या गृहीत धरुन  147.20 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपुजन  संपन्न झाले. यात नविन विहीर, उद्धरण नलीका, पंपींग मशिन, पंप हाऊस, उंच जागी जलकुंभ बांधणे व वितरण व्यवस्थेचा समावेश राहील. तसेच जल जीवन मिशनअंतर्गत पाचोराबारी  गावातील 7.68 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या कामात विंधन विहीर, जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ,वितरण व्यवस्था, पाईपलाईन, शुद्ध व अशुद्ध पंपिग सेटचा समावेश राहील. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.