बोगस बियाणे विक्री रोखा, पीक कर्ज वितरणात सुलभता आणावी – पालकमंत्री गिरीष महाजन

0
4

लातूर, दि. 16 : खरीप हंगामात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी दक्षता बाळगावी. यासाठी कृषि विभागाच्या दक्षता पथक आणि भरारी पथकांनी सतर्क राहून बियाणे विक्रीचे संनियंत्रण करावे, असे आदेश पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आज दिले. तसेच पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करता बँकांनी कर्ज वितरणात सुलभता आणण्याच्या सूचना केल्या.

खरीप हंगामपूर्व तयारी बैठक पालकमंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषि विकास अधिकारी एस. आर. चोले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपस्थित होते.

खरीप हंगाम हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असून बोगस बियाणे, खतांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते वेळेत आणि मागणीनुसार उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. खतांचा तुटवडा भासू नये, यासाठी मागणी आणि पुरवठ्याचे योग्य व्यवस्थापन करावे. जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे सोयाबीनच्या बियाणांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता ठेवावी. घरचे बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांना उगवण क्षमता तपासणीबाबत मार्गदर्शन करावे. तसेच उगवण क्षमता तपासूनच बियाणे वापरण्याचे आवाहन करावे, असे पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले.

शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी, पेरणीसाठी पीक कर्ज वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे. बँकांनी पात्र शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, कर्ज वितरणात सुलभता आणावी. जिल्हास्तरावर नियमितपणे बँकांची बैठक घेवून कर्ज वितरणाचा आढावा घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. महाजन यांनी केल्या. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे. पीक विमा मिळण्यासाठी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे, याबाबत जनजागृती करावी. केवळ तांत्रिक कारणांमुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमुळे सिंचनासाठी फायदा झाला असून या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त कामे प्रस्तावित करावीत. त्यामुळे भविष्यात सिंचनासाठी अधिकाधिक सुविधा निर्माण होतील, असे पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले. तसेच अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा. जिल्ह्यात वीज कोसळून जीवितहानी होण्याचे प्रमाण अधिक असून हे टाळण्याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. या संशोधनाला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

वन्यजीवांपासून पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतील संरक्षक कुंपण करणे आवश्यक असून यासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळावे. सौर कृषिपंपांची मागणी वाढत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जावा, असे आमदार बाबासाहेब पाटील यावेळी म्हणाले.
प्रमाणीकरण न झालेले बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात येत असल्याने बियाणे न उगविण्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे प्रमाणीकरण न झालेले बियाणे विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देवू नये, असे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी सांगितले.

गतवर्षी शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव झालेल्या मंडळांमध्ये कृषि विभागाने शंखी गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करावे. यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करून शेतकऱ्यांना माहितीपत्रिका, व्हिडीओ आदी साहित्याद्वारे माहिती द्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी होणाऱ्या सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठीही शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे. सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून प्रत्येक गावामध्ये किमान पाच शेततळी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्ह्यात आयोजित शिबिरांमध्ये शेततळ्यांचे अर्ज भरण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केल्या.

खरीप हंगामात 6 लाख 41 हेक्टरवर होणार पेरणी

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. जिल्ह्यात यंदा 6 लाख 41 हजार 250 हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. यामध्ये सर्वाधिक 4 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, 90 हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पेरणीचे नियोजन असल्याचे श्री. गावसाने यांनी सांगितले. पेरणीसाठी 3 लाख 67 हजार क्विंटल सोयाबीन बियाणे आवश्यक असून शेतकऱ्यांकडे 5 लाख 19 हजार 600 क्विंटल घरगुती बियाणे उपलब्ध आहे. बियाणे बदलासाठी आवश्यक 1 लाख 28 हजार 450 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उर्वरित पिकांचे बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी खताचा सरासरी 96 हजार 581 मेट्रिक टन वापर होतो, गतवर्षी 1 लाख 5 हजार 575 मेट्रिक टन वापर झाला होता. यावर्षी 1 लाख 12 हजार 260 मेट्रिक टन खत मंजूर झाले आहे. महिनानिहाय त्याचे वितरण केले जात आहे. नॅनो युरियाप्रमाणेच नॅनो डीएपीचा वापर करण्यासाठीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. बोगस बियाणे, खतांची विक्री रोखण्यासाठी गुण नियंत्रण पथकांमार्फत आवश्यक कार्यवाही केली जात आहे. याविषयीच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा आणि विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच राज्यस्तरावर टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आल्याची माहिती श्री. गावसाने यांनी दिली.

पीक प्रात्याक्षिके, शेतीशाळा, हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण, पिकांची उत्पादकता, नैसर्गिक आपत्ती आदी बाबींचा आढावाही पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी घेतला. शंखी गोगलगायीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी कृषि विभागाने तयार केलेल्या घडीपुस्तिका, भित्तीपत्रिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.