हिंगोली जिल्हयात 3.6 रिश्‍टर स्केलचा भूकंप, 7 मिनिटांच्या अंतराने दोनदा हादरे

0
9

हिंगोली,ता. 15- जिल्हयात आज (ता. 15) सकाळी 7 वाजून 4 मिनीटांनी 3.6 रिश्‍टर स्केलचा भूकंप झाला आहे. अनेक गावांतून मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या पहिल्या धक्क्यानंतर पुन्हा 7 वाजून 12 मिनिटांनी पुन्हा हादरा बसला आहे.

4, 5 वर्षांपासून सातत्याने प्रकार

हिंगोली जिल्हयात मागील चार ते पाच वर्षापासून भुगर्भातून आवाज येण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. अचानक जमिनीतून गडगडाट आवाज येऊन जमीन हादरण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. सुदैवाने आजपर्यंत या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी वा वित्त हानी झाली नाही.

या गावांमध्ये हादरे

आज सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी भुगर्भातून मोठा आवाज झाला. त्यानंतर सात मिनिटांनी लगेचच सात वाजून १२ मिनिटांनी दुसरा आवाज झाला आहे. जिल्हयातील पिंपळदरी, आमदरी, राजदरी, सोनवाडी, जामगव्हाण, कंजारा, पुर, काकडदाभा, फुलदाभा, जलालधाबा, नांदापूर, पांगरा शिंदे, कुरुंदा, सिंदगी, पोतरा, लक्ष्मणनाईकतांडा, तामटीतांडा, कुपटी, वापटी, हिंगणी, खेड यासह परिसरातील गावांमधून मोठा आवाज झाला तर हिंगोली शहरापर्यंत याचे धक्के जाणवले आहेत.

10 किलोमीटर खोलीवर भूकंप

रिश्‍टर स्केलमध्ये या भुकंपाची तीव्रता 3.6 एवढी नोंदवली आहे. त्याची खोली 10 किलोमीटर एवढी असल्याचे भुकंप मापकामध्ये नोंद झाली आहे. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने दोन वेळा आवाज झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाला वेळोवेळी या आवाजाबद्दल माहिती दिल्यानंतरही त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासन देखील हतबल झाले आहे.

गुढ आवाज गावकऱ्यांच्या अंगवळणी

भुकंपाचा हादरे जाणवलेल्या पिंपळदरी या गावातील बापुराव घोंगडे यांनी सांगितले की, या परिसरात मागील सहा ते सात वर्षापासून जमीनीमधून गुढ आवाज येत आहेत. मात्र हे आवाज नेमके कशामुळे येत आहेत याची माहिती अद्यापही गावकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे हे गुढ आवाज आता गावकऱ्यांच्या् अंगवळणीच पडले आहेत. प्रशासनाने या भागात पाहणी करून आवाजाचे नेमके कारण शोधून त्याची माहिती गावकऱ्यांना द्यावी.