आयटी विभागाला सापडले नांदेड मधील भंडारी कुटुंबीयांकडे १७० कोटींचे घबाड

0
6

१४ कोटी रोख आणि ८ कोटींच्या १२ किलो दागिने आणि इतर बेहिशेबी मालमत्ता

नांदेड – आयकर विभागाने नांदेडमध्ये शुक्रवारी एकाचवेळी सात ठिकाणी फायनान्स कंपनी चालविणाऱ्या भंडारी कुटुंबियांवर छापेमारी केली. जवळपास ७२ तास चाललेल्या या कारवाईत तब्बल १७० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.त्यामध्ये १४ कोटी रोख आणि ८ कोटींच्या १२ किलो दागिन्यांचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यातील आतापर्यंतची आयकर विभागाची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईमुळे नांदेडातील फायनान्स कंपनी आणि बड्या उद्योगपतींचे मात्र धाबे दणाणले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. त्यात नाशिकसह नांदेड, नागपूर आयकर विभागाच्या पथकाकडून ठिकठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. नांदेडातील भंडारी कुटुंबियांचीही फायनान्स कंपनी आहे. त्यांचा मराठवाड्यात जमिनी खरेदी-विक्रीचाही मोठा व्यवसाय आहे. त्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या फायनान्स कंपनीत आठ नातलगांचा समावेश आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार केले असून आयकर चुकविल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी पहाटे चार वाजताच आयकर विभागाच्या ८० अधिकाऱ्यांचे पथक नांदेडात धडकले होते.

शिवाजीनगर भागातील अली भाई टॉवर येथे असलेल्या फायनान्स कंपनीच्या मुख्य ऑफिससह शहरात भंडारी कुटुंबियांच्या मालकीच्या इतर सहा ठिकाणी एकाचवेळी धाडी मारण्यात आल्या. दोन दिवसांच्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांच्या हाती मोठ्या प्रमाणात व्यवहाराची कागदपत्रे लागली होती. त्यानंतर भंडारी यांच्या बंधूंच्या घरी छापा मारण्यात आल्या. या ठिकाणी गादीच्या खोळात पाचशेंच्या नोटांची बंडले आढळून आली. छाप्यातील ही रक्कम मोजण्यासाठी पथकाला तब्बल १४ तास लागले. सकाळी दहा वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत न थांबता ही मोजणी करण्यात येत होती. सर्व रोकड १४ कोटी रुपये निघाली. त्याचबरोबर ८ किलो सोनेही आढळून आले. सर्व मिळून जवळपास १७० कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती असल्याची माहिती आहे. दरम्यान, भंडारी कुटुंबियांना हे १७० कोटी रुपये आपलेच असल्याचे मान्य करावे लागेल किंवा आपल्या वकिलामार्फत आयकर विभागाचे म्हणणे पुराव्यानिशी खोडावे लागणार आहे.

दागिन्यात ५० सोन्याची बिस्किटे

दागिन्यात सोन्याची ५० हून अधिक बिस्किटे होती. तसेच हिरे व इतर मौल्यवान दागिने आहेत. भंडारी यांच्या वेगवेगळ्या आस्थापनांमधून कागदपत्रे, सीडी, हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.