मुंबई, दि. 29 : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या संघर्षाची माहिती नवीन पिढीसह देशभरातील नागरिकांना होणे आवश्यक आहे. मुक्तीसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यानिमित्त मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करून मुक्तीसंग्रामाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त मंत्रिमंडळाची बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री यांना विनंती करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांचा मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी आज आढावा घेतला. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सीमा व्यास, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, मराठवाडा विभागीय आयुक्त मधुकर आर्दड, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त 15 ते 17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम केंद्रभागी ठेवून विविध स्पर्धा, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच माहितीपट तयार करण्याचे निर्देश मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी दिले. ते म्हणाले की, औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी असल्याने शहरामध्ये शासकीय इमारती, तसेच पथदिव्यांवर रोषणाई करावी तसेच चौकांचे सुशोभीकरण, भिंतींवर सयुंक्तिक चित्रे, रंगरंगोटी करावी. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांवरही रोषणाई करण्यात यावी.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सर्वांना सहभागी होता यावे यासाठी 26 जानेवारीपर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी दिले. यामध्ये प्रभातफेरी, व्याख्याने, विविध गटांच्या मॅरेथॉन स्पर्धा, लोककला, भारूड, पोवाडे आदी सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गायन, चित्रकला, निबंध आदी स्पर्धा, महानाट्य स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या कला गुणदर्शनाचे कार्यक्रम, नवरात्रौत्सवात महिलांसाठी स्पर्धा, प्रबोधनकार/ कीर्तनकारांची परिषद, चित्ररथ, रॅली आदींचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी केली. सर्व कार्यक्रमांची मध्यवर्ती कल्पना ही मुक्तीसंग्राम ही असावी. तसेच कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता आणि समन्वय असावा, असे निर्देशही त्यांनी दिले. विविध माध्यमांचा कल्पकतेने वापर करून कार्यक्रमांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने देशभरातील नागरिकांना आवाहन करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत माहितीपट तयार करण्यात येणार असून कॉफी टेबल बुक देखील तयार करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. याबाबतचा आढावा घेऊन मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी त्याबाबत सूचना केल्या. या स्मारकामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी प्रदर्शनी, आर्ट गॅलरी, प्रेक्षागृह, नाट्यमंच,