9 वर्षे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण विषयावरील डिजिटल मल्टिमिडीया प्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
5

शारदीय नवरात्र महोत्सव तथा आश्विन पौर्णिमेनिमित्त पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी केंद्रिय संचार ब्युरोचा अनोखा उपक्रम

 तीन दिवसीय प्रदर्शनाचा महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक,तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यातील सुमारे 12 लाख भाविकांनी घेतला लाभ

 धाराशिव दि 29 :  शारदीय नवरात्र महोत्सव तथा आश्विन पौर्णिमेनिमित्त पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर व जिल्हा पोलीस प्रशासन, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने  तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोल प्लाझा येथे दिनांक २६ ते २८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ९ वर्ष सेवा,सुशासन आणि गरीब कल्याण व भरडधान्ये आंतरराष्ट्रीय वर्ष २०२३ या विषयावर डिजिटल मल्टिमिडीया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

   प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तासाठी विशेषतः हे प्रदर्शन लावण्यात आले होते.या तीन दिवसीय प्रदर्शनला सुमारे 12 लाख भाविकांनी भेट दिली.यावेळी कर्नाटक राज्यातील हुबळी,धारवाड, रायचूर,यादगीर,कलबुर्गी,विजयापुरा व बिदर जिल्ह्यातुन आलेल्या भक्तांनी प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या माहितीबद्दल समाधान व्यक्त केले.

 तेलंगणा राज्यातील हैद्राबाद, तांडुर व सेडम,विकाराबाद,हुमनाबाद जिल्ह्यातील भक्तगण प्रतिक्रिया देताना म्हणाले की,अशा प्रदर्शनांचे  सर्वत्र आयोजन केले पाहिजे. भक्तीसोबत विधायक कामांची माहिती देखील मिळाल्याचा आनंद यावेळी सर्व भाविकांकडून व्यक्त करण्यात आला.

तुळजापुर येथील महिषासुर मर्दिनी सांस्कृतीक कलापथकाच्या कलाकारांकडून लोकगीत व भारुडच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या ९ वर्षातील कल्याणकारी योजनांची व भरडधान्याविषयी माहिती देऊन भाविकांचे प्रबोधनात्मक मनोरंजन केले.यावेळी मोठ्या संख्येने लहान मुले,युवक,युवती,महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.

         तुळजापुरला पायी जाणाऱ्या भाविकांना स्वच्छतेविषयी प्रेरित करण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोतर्फे प्रदर्शनस्थळी ‘सेल्फी विथ पीएम, सेल्फी विथ क्लीन इंडिया’ फोटो बुथ ठेवण्यात आले होते.या उपक्रमाला युवकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.भाविकांनी ‘आई राजा उदो उदो,सदानंदिचा उदो उदो’ च्या जयघोषासोबत ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत, निरोगी भारत आणि ग्रीन भारत यासारख्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

 या प्रदर्शनामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने मागील 9  वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी,देशात जलदगतीने होत असलेली विकासकामे आणि धोरणांची माहितीसह भारतीय भरडधान्याचा इतिहास,ऐतिहासिक नावे,विविध दुर्मिळ प्रजाती आणि आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयीची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली.

 सोबत गरीब वंचित, आदिवासी,महिला,युवा,शेतकरी, उद्योजक यांच्या विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय,उज्वला गॅस योजना, डिजिटल इंडिया,प्रधानमंत्री पीक विमा योजना,किसान सन्मान योजना, आवास योजना,पीएम श्री योजना यासारख्या कल्याणकारी योजनांची माहिती डिजिटल मल्टिमिडीया स्क्रीनच्या माध्यमातून मांडण्यात आली होती.