आर.पी कॉलेज येथे राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन उत्साहात

0
4

धाराशिव,दि.2-24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले.ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले.यात सुरक्षेचा हक्क,माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार,म्हणणे मांडण्याचा हक्क,तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क व ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार या हक्कांची सामान्यांना जनजागृती व्हावी या उद्देशाने 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.

    रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे आज 2 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रमुख मुकुंद सस्ते, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास वडगावकर,ग्राहक पंचायत संस्था महाराष्ट्राचे प्रतिनिधी हेमंत वडणे,अखिल भारतीय ग्राहक पंचायत संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,धाराशिव तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे,पुरवठा तहसीलदार प्रभू जाधव,आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी कृष्णा शिंदे,नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे,संपत धडके  यांची प्रमुख उपस्थिती होती.

           राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या दिवशी ग्राहकांच्या जनजागृतीसाठी नागरी पुरवठा विभाग,वजन मापे निरीक्षक कार्यालय,अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्यामार्फत प्रबोधन,प्रात्यक्षिक तसेच व्याख्याने आणि प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. दरवर्षी केंद्र व राज्य सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागातर्फे एक थीम  ठरवली जाते आणि त्यानुसार ग्राहक दिन साजरा केला जातो.यावेळी “ई-कॉमर्स आणि ई-ट्रेड ” या थीमवर ग्राहक हक्क दिनाची थीम ठेवण्यात आली होती.दिलेल्या थीमवर मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले. विषेश म्हणजे या कार्यक्रमास कॉमर्स शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी केले.सूत्रसंचालन वृषाली तेल्लोरे यांनी केले.आभार तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी मानले.