परभणी, 18 – समाजात आज विस्तारीत जाणारी सामाजिक दरी कमी करण्यासाठी सर्वांनीच सामाजिक सलोखा आणि शांततेकरीता पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची झालेली अवमानाची घटना व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी ॲड. मेश्राम आज परभणी शहराच्या दौऱ्यावर आले होते. यानिमित्ताने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक व पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सदर आवाहन केले.
ॲड. मेश्राम यांनी सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर परिसराची पाहणी केली व घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी घटनेचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे आदींसह पोलीस अधिकारी, महानगर पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी घडलेल्या घटनेची व जिल्हा व पोलीस प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची वस्तुस्थिती सविस्तरपणे मांडली.
ॲड. मेश्राम यांनी घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या घटनेबाबत अतिशय संवेदनशील असून या प्रकरणी ते योग्य तो निर्णय घेतलीच, असे सांगितले. तसेच घडलेल्या घटनेची पारदर्शकपण चौकशी करण्यात यावी. ज्या शिक्षित व होतकरु तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वी विचार करुन त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दोषी पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. एफआयआर शिवाय नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांचे पंचनामे पूर्ण करावेत. त्याची प्रत शासनासह व्यापारी व आयोगाला द्यावी. असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
पत्रकार परिषदेत ॲड. मेश्राम यांनी सदर बाबींची माहिती देऊन प्रशासनाने संयमाने परिस्थितीत हाताळल्याचे सांगत राजकारणासह सर्वच स्तरातील लोकांनी सामाजिक दरी कमी करण्यासाठी आणि समाजात सामाजिक सलोखा, एकोपा व शांतता कायमपणे टिकवण्याकरीता पुढाकार घेण्याचे आवाहन केले.