जिल्ह्यामध्ये निर्यातक्षम उद्योग उभारणीस मोठा वाव, नवउद्योजकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

0
24
• जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन
परभणी, दि. 19 : जिल्ह्यामध्ये निर्यातवाढीस चालना मिळण्यासाठी एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्याकरिता सध्याची आव्हाने, संधी व धोरणे यांची माहिती जिल्ह्यातील उद्योजक, निर्यातदार व स्टेक होल्डर्स यांना होण्यासाठी जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन ही एक दिवसीय कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी एमएसएमई विभागीय अधिकारी एन.एन. इस्टोलकर, ईवाय कन्सलटंट अमोल मोहीते, पोस्ट अधीक्षक श्री. देशमाने, एसबीआय आरसेटी संचालक श्री. कुशवाह, नांदेड उपविभागीय कार्यालय अधिक्षकीय उद्योग अधिकारी अमोल इंगळे, कृषि विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ अमित तुपे, जिल्ह्यातील निर्यातदार उद्योग घटकाचे व्यवस्थापक मो. अयुब अली तसेच सुक्म्न, लघु व मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संघटना व संस्था, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी उत्पादक सहकारी संस्था, शेतीमाल उत्पादक संस्था, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधीत उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचलन समितीचे सदस्य, संशोधक व बँका कार्यशाळेस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गावडे म्हणाले की, परभणी हा कृषिप्रधान जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये इतर उद्योगांचेही प्रमाण वाढविणे अत्यंत आवश्यक असून त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगार मिळू शकेल. जिल्ह्यामध्ये निर्यातक्षम उद्योग उभारणीस मोठा वाव आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यामधून डबाबंद मांस, प्लास्टीक रोप्स, कॉटन इत्यादी निर्यात होत असून मराठवाडा विभागामध्ये परभणी जिल्हा हा निर्यातीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जिल्ह्यातील नव उद्योजकांनी आपला उद्योग सुरु करतांना परिपूर्ण अभ्यास करुनच उद्योगांची सुरवात करावी, जेणेकरुन उद्योग चालू झाल्यानंतर बंद पडणार नाही. याबाबत जिल्हा उद्योग केंद्र व शासकीय यंत्रणांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. तसेच जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणावर उद्योग वाढीसाठी सर्व संबंधीत यंत्रणांनी प्रयत्न करावेत, जेणेकरुन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीस वाव मिळून जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवक/युवतीचे इतर ठिकाणी स्थलांतर होणार नाही, असे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी नमुद केले.
कार्यशाळेस उपस्थित विविध यंत्रणांचे अधिकारी/ प्रतिनिधी, तज्ञांनी यावेळी यथोचित मार्गदर्शन केले. सुरुवातीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी प्रास्ताविक करुन कार्यशाळा आयोजनबाबतचा उद्देश विषद केला. तर जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक एन.एन. जावळीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यशाळेचे यशस्वी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे सर्व अधिकारी/उद्योग निरिक्षक/कर्मचारी, तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, परभणी, मिटकॉन प्रशिक्षण संस्था, परभणी यांनी परिश्रम घेतले.